top of page

सुरुवात !

  • Aug 4
  • 2 min read

स्वतः संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांनी जेव्हा भागवत गीतेचे भाषांतर बोली भाषेत केले तेव्हा लिहिले आहे कि 

"हें अनावर न विचारितां । वायांचि धिंवसा उपनला चित्ता । येऱ्हवीं भानुतेजी काय खद्योता । शोभा आथी ।।" 

अर्थात "हे गीतार्थाचे काम फार कठीण, न झेपणारे आहे याचा विचार न करता तो स्पष्ट करण्याचे साहस माझा चित्तात उत्पन्न झाले आहे. वास्तविक सूर्याच्या तेजापुढे काजव्याचे तेज ते काय पडणार ? " 

 

त्यामुळे ज्ञानेश्वरीचा अर्थ मी कोणत्याही प्रकारे लिहिण्याचे धाडस करूच शकत नाही परंतु मला उमगलेले ज्ञानेश्वरी आणि त्याचा अनुभव आपली सर्वांसमोर उघडून ठेवत आहे. या लेखनात जे चांगलं असेल ते सर्व भगवान श्रीकृष्ण आणि ज्ञानेश्वरमाउलींचे आहे आणि ज्या चुका असतील त्यांची जबाबदारी संपूर्णतः माझी !  

 

माझा हा पहिला लेखनाचा प्रयत्न श्री विठुरायाच्या आणि संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांच्या चरणी अर्पण .... 

राम कृष्ण हरी 

 

कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती श्री ज्ञानेश्वर माउली म्हणतात,

 

आजि श्रवणेंद्रियां पाहलें । जें येणें गीतानिधान देखिलें ।

आतां स्वप्नचि हें तुकलें । साचासरिसें ॥

आधींचि विवेकाची गोठी । वरी प्रतिपादी श्रीकृष्ण जगजेठी ।

आणि भक्तराजु किरीटी । परिसत असे ॥

जैसा पंचमालापु सुगंधु । कीं परिमळु आणि सुस्वादु ।

तैसा भला जाहला विनोदु । कथेचा इये ॥

कैसी आगळिक दैवाची । जे गंगा जोडली अमृताची ।

हो कां जपतपें श्रोतयांचीं । फळा आलीं ॥

आतां इंद्रियजात आघवें । तिहीं श्रवणाचें घर रिघावें ।

मग संवादसुख भोगावें । गीताख्य हें

अर्थात - 

आज श्रवणेंद्रियांना सुकाळ झाला, कारण गीतेसारखा ठेवा पहावयास मिळाला. जसे काही स्वप्नच खरे व्हावे तसे आता झाले आहे. अगोदरच ही विचाराची कथा, त्यात तिचे प्रतिपादन जगात श्रेष्ठ असे श्रीकृष्ण करीत असून भक्तांमधे श्रेष्ठ असणारा अर्जुन ते ऐकत आहे.ज्याप्रमाणे पंचमस्वर व सुवास किंवा सुवास व उत्तम रुचि यांच्या गोड मिलाफाचा योग यावा (त्याप्रमाणे) या कथेतील चर्चेचा योग मोठ्या बहारीचा जमला आहे.काय दैवाचा जोर आहे पहा ! कारण या जोरामुळे ही अमृताची गंगाच लाभली म्हणावयाची, किंवा श्रोत्यांची जपतपादी अनुष्ठाने या कथेच्या रूपाने फळास आली आहेत.आता एकूण एक इंद्रियांनी श्रवणेंद्रियांचा आश्रय करावा आणि मग गीता नावाच्या या संवादाचे सुख भोगावे.

Comments

Rated 0 out of 5 stars.
No ratings yet

Add a rating
bottom of page