अध्याय सहावा - आत्मसंयमयोग
- Alap Phadke
- 22 hours ago
- 6 min read
आपण मागील पाच अध्यायांमध्ये वारंवार इंद्रियांवर ताबा असावा ! संयम राखावा ! योगसाधना करावी अर्थात योगस्थ व्हावे आणि मग निर्णय घ्यावे या बद्दलचा भगवंताचा उपदेश ऐकला परंतु आपल्याला आज देखील प्रश्न पडतो ना ? योगस्थ होणे म्हणजे सन्यास घ्यावा का ? सर्वच त्याग करावा का ?
तर नाही ! संसारात राहूनच हि योगस्थ अवस्था आपल्याला धारण करायची आहे आणि ती धारण केल्याने आपली वृद्धी होणार आपल्याला ध्येयप्राप्ती होणार हे निश्चित आहे.
याच गोष्टीचा उपदेश भगवंत अर्जुनाला तथा आपण सर्वांना करत आहेत तर आपण शक्य त्या साऱ्या प्रश्नांची उत्तरे शोधण्यासाठी , नवीन ज्ञान संपादन करण्यासाठी अतिशय संयमाने आणि विनम्रतेने सुरु करूयात अध्याय सहावा "आत्मसंयमयोग"
१. आपल्या मनाची चंचल अवस्था !
सर्वात आधी आपला मनावर ताबा नाही, आपले मन चंचल आहे म्हणजे नक्की काय होत ?
या चंचल मनामुळे आपले विविध प्रकारे कसे नुकसान होते हे भगवंताने स्पष्ट केले आहे त्यातील काही निवडक मुद्दे पाहुयात.
- पाहिलं म्हणजे चंचल मन आपल्या बुद्धीला छळत! आपण एखाद्या गोष्टीचा विचार करत असताना सुद्धा मन स्थिर नसत , वेगवेगळे विचार मनात येतात आणि मग आपली तल्लख बुद्धिमत्ता असून देखील आपण विचार करू शकत नाही.
-आपण एखादा निश्चय करणार असतो तेव्हा चंचल मनामुळे आपण तो नक्की करू शकत नाही आणि जरी केला तरीही याच मनामुळे आपण त्या निश्चयावर ठाम राहू शकत नाही. उदा. आपण पौष्टिक आहार घेण्याचा विचार केला तरी निश्चय करू शकत नाही , दुसऱ्या क्षणाला काय गरज आहे का ? सगळं व्यवस्थित तर आहे असे म्हणून आपण निशचय करणं टाळतो.
- आपले मन आपल्याला धैर्यापासून लांब नेते, एखादे धाडसी कृत्य करण्यासाठी जेव्हा आपण सज्ज होत असतो तेव्हा ते न करता सोप्या मार्गाने देखील आपले काम साध्य होऊ शकते . हा धाडस नाही तर मूर्खपणा आहे असे वारंवार आपले मन आपल्याला सांगत असते थोडक्यात चंचल मनामुळे धाडस करायला आपल्याला भीती वाटत राहते.
- मन हे कधीच एका जागी नसत ! शरीर एका जागी असलं तरीही मन हे वार्याप्रमाणे दाही दिशा हिंडून येत ! यामुळे आपलं चित्त एकाग्र होत नाही आणि सर्वात महत्वाचे म्हणजे या मनाला थांबविण्याचा आपण जेवढा प्रयत्न करतो तेवढ्या अधिक वेगाने मन धावू लागते...
२. योगस्थ मती
तर आता या धावणाऱ्या मनाला , या चंचल मनाला शांत कसे करावे ? तर त्याचे उत्तर म्हणजे "योगस्थ मती " अर्थात योगी होणे हे आहे.
आता मुळात योगी म्हणजे काय ? योगी असण्याची देखील अनेक लक्षणे किंवा योगस्थ होण्यासाठीचा गोष्टी भगवंताने अर्जुनाला सांगितल्या परंतु इथे आपण सर्वांना समाजातील आणि आजच्या काळासाठी योग्य असतील अशी काही निवडक मांडत आहे.
- सर्वात प्रथम म्हणजे योगस्थ होण्यासाठी आपण संतुलित आहार करणे आणि पुरेशी झोप घेणे हे अतिशय महत्वाचे आहे .
आजकालच्या काळात या दोन गोष्टी सोडल्या तर आपल्यातले कित्येक जण व्यायाम करत असतील, प्राणायाम करत असतील परंतु या मूलभूत गोष्टी आपण चुकतो आणि आपल्या प्रयत्नांना यश मिळत नाही.
- सुख आणि दुःख समान मानणे म्हणजे योगस्थ , अर्थात असे अजिबात नाही कि सुख किंवा दुःखात आपल्याला भावनाच येऊ नयेत किंवा आपण आनंद किंवा शोक व्यक्त करू नये ! हा सर्वात मोठा गैर समज आहे.
सुख आणि दुःख समान मानणे याचा अर्थ आपण यापैकी कोणत्याही भावनेत असलो तरी त्यांचा परिणाम आपल्या कर्मावर, आपल्या ध्येयप्राप्तीवर होऊ द्यायचा नाही आणि आपले कार्य करताना योग्य त्याच्या गोष्टी निवडाव्यात.
यालाच आजच्या भाषेत आपण म्हणतो ना कि Personal आणि Professional एकत्र करू नये ! हीच गोष्ट सगळ्या ठिकाणी लागू होत नाही का ?
एखाद्या चांगल्या वाईट गोष्टीचा परिणाम दुसऱ्या गोष्टीवर होऊन देऊन उपयोग नाही .
- मनावर विजय मिळविणे. याचा अर्थ जर आजच्या काळाला अनुसरून आपण घेतला तर उत्तम उदाहरण म्हणजे दुसऱ्या दिवशी लवकर घर सोडायचे असल्यास आपण रात्री उशिरापर्यंत बाहेर राहतो का ? पार्टी मित्र मैत्रिणी हे सगळेच आपण टाळून झोपतो कारण दुसऱ्या दिवशीचे काम महत्वाचे असते.
अशा वेळी आपण मनावर ताबा ठेवतो ना ? मग जर कामासाठी मनावर ताबा राहू शकतो तर स्वतः साठी का नाही ?
स्वतःच्या वृद्धी साठी ? ध्येयप्राप्तीसाठी आपण हा ताबा का ठेऊ शकत नाही ?
- क्षणिक मोह आणि दूरच्या परिणामांचा विचार
योगस्थ व्यक्ती याचा विचार निक्षून करत असतात परंतु आपण विवेक बुद्धीने सगळीकडे वागतो का ? एखादी गोष्ट आपल्याला हवी असं वाटलं कि पुढच्या मागच्या कोणत्याही परिणामांचा विचार न करता आपण त्याच्या आहारी जातो.
एक साधं उदाहरण आहे आपल्या तरुण पिढीला तर या गोष्टींची पूर्ण कल्पना आहे कि क्षणिक शरीरसुख, मद्यपान, अयोग्य आहार या गोष्टी आपल्यासाठी घटक आहेत किंवा चांगल्या नाहीत परंतु तरीही आपण त्याच्याकडे ओढले जातो.
परंतु आपल्याला माहित आहे कि ध्यान साधना , पौष्टिक आहार किंवा व्यायाम महत्वाचा आहे पण आपण त्याकडे तेवढ्याच ताकदीने ओढले जातो का ?
आपण सर्वांनी याचा विचार करणे गरजेचे आहे.
अशी अनेक लक्षणे समजून घेतल्यावर आपण म्हणाल कि हि तर सगळी संतांची लक्षणे आहेत मग आपण सन्यास घ्यावा का ? आपली हे सर्व करायची कुवत आहे का ?
आणि असेच प्रश्न अर्जुनाने भगवंताला विचारले कि संसारात राहून हे सगळं करणं कस शक्य आहे ?
आपल्याला देखील यातील हाच प्रश्न पडला असेल कि या संसारात राहून , आपली कर्तव्ये करून सर्वांपासून एवढे विभक्त कसे राहावे ?
तर यासाठीच भगवंताने अर्जुनाला तथा संपूर्ण सृष्टीला योग कसा करावा याचा उपदेश केला.
३.योगाभ्यास
मित्रांनो आज संपूर्ण जगात आपण जो योगा किंवा मेडिटेशन म्हणून पाहतो, शिकतो त्या सर्वांचे मूळ भगवंताने गीतेत या अध्यायात सांगितले आहे. अतिशय सोप्या शब्दात आपण सर्वांना योगशास्त्र उलगडून मांडण्याचा प्रयत्न करतो.
गीतेमध्ये तथा ज्ञानेश्वरी मध्ये यातील अनेक टप्प्याचे व्यवस्थित वर्णन आणि विस्तार आहे परंतु इथे मांडताना मात्र मी ते अतिशय साध्य सरळ आणि सोप्या भाषेत मांडण्याचा प्रयत्न करत आहे.
योगाभ्यासाचे ३ महत्वाचे टप्पे पाहू.
- कुठे बसावं ? योगाभ्यासाच ठिकाण
भगवंत म्हणतात योगाभ्यासाची शांत असं ठिकाण निवडावं जिथून उठण्याची इच्छा होणार नाही, आपला उत्साह वाढेल आणि जिथे सकारात्मक ऊर्जा जाणवेल.
आणि असे स्थान जर निसर्गरम्य असेल तर उत्तमच !
आजच्या काळात आपले घर, ऑफिस , एखादे जवळील मैदान , गच्ची कुठेही बसून आपण योगाभ्यास करू शकतो.
- कसं बसावं ?
योगाभ्यासाची एक आसन जे जास्त उंच नको (गादी सारखे जाड आणि पाटासारखे )
अशा आसनावर पाठीला कोणताही आधार न घेता मांडी घालून ताठ बसावे.
आपले डोळे बंद करून मन एकाग्र करावे .
- काय करावे ?
डोळे बंद करून आपण भगवंताचे स्मरण करावे
एकाच ठिकाणी लक्ष केंद्रित करावे
आणि आपल्या मनात इतर कोणताही विचार येणार नाही याची काळजी घ्यावी.
या नंतर विविध प्रकारची योगासने, त्यांची प्रक्रिया, प्रत्येक आसनाचे फायदे अतिशय विस्तृत भाषेत ज्ञानेश्वरीत सांगण्यात आले आहेत.
आपल्याला हि आसने करता आली तर उत्तमच परंतु नाहीच तर आजच्या काळात केवळ वर लिहिली प्रक्रिया जरी आपण दिवसातून काही वेळ केली तरी आपले मन शांत होईल, इंद्रियांवर ताबा ठेवण्यास आपल्याला सोपे होईल आपण प्रत्येक निर्णय योगस्थ बुद्धीने घेऊ शकू.
योगाभ्यासाचे असे अनंत फायदे आहेत परंतु यात ज्ञानेश्वर माउली म्हणतात कि जसे ढग बाजूला झाले कि सूर्य तेजस्वी दिसू लागतो तसे योगाभ्यासामुळे माणूस अधिकाधिक तेजस्वी वाटू लागतो...
आपल्याला वाटेल कि हे खरंच शक्य आहे का परंतु जर अपार श्रद्धेने, निश्चयाने आणि अभ्यासाने आपण प्रक्रिया केली तर हे सहज शक्य आहे असे भगवंत म्हणतात.
आपण सन्यास घेऊन किंवा सर्वच त्याग करून नाही तर संसारात राहून मनाने योगस्थ होण्याचा प्रयत्न करूया !
४. आपली मराठी भाषा
भगवंताने अर्जुनाला दिलेले ज्ञान आपल्यासमोर मांडताना ज्ञानेश्वर माउली म्हणतात कि हि मराठी भाषा किती सुंदर आहे.
"माझा मराठाचि बोलु कौतुकें । परि अमृतातेंही पैजां जिंके ।
ऐसीं अक्षरें रसिकें । मेळवीन ॥"
अर्थात - माझी मराठी भाषा एवढी गोड हे कि ती अमृताशी देखील पैज जिंकेल , असा मधुर रस भरलेली रचना मी करत आहे.
"हां हो नवल नोहे देशी । मऱ्हाटी बोलिजे तरी ऐशी ।
वाणें उमटताहे आकाशीं । साहित्य रंगाचे ॥"
अर्थात - अहो देशीभाषारूपी आकाशात अलंकाररूपी रंगाचे निरनिराळे प्रकार स्पष्ट होत आहेत अशी मराठी भाषा बोलता येते हे आश्चर्य नव्हे काय ?
अहो मराठी भाषा एवढी सुंदर आहे आणि एवढी व्यापक आहे कि ती सर्व इंद्रियांचे लाड पुरवते तरी उरते आणि सूर्यसमान सर्वांना सामावून घेते.
ग्रंथराज ज्ञानेश्वरी लिहिणाऱ्या संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांना सुद्धा मराठी भाषेवर प्रेम वाटते आणि आज तरी भाषा साहित्याने एवढी श्रीमंत आहे कि आपली हयात हयात खर्ची घातली तरीही आपण सर्वकाही वेचू शकत नाही.
पण आपल्या रोज़च्या जीवनात जेवढ्या आवडीने आपण इंग्रजी कादंबऱ्या वाचतो , इंग्रजी मधील आपल्याच पुराणाच्या गोष्टी वाचतो मग आपल्या भाषेतील पुस्तके जीच्यसातून जगाने प्रेरणा घेतली ती वाचायला हवी ना ?
एकदा विचार करा !
५. गुरुजन
अशा आपल्या अभिजात मराठी भाषेतून आपल्या आयुष्यात ज्ञानाचे बीज पेरणाऱ्या गुरूंची महती अपरंपार आहे.
आपल्या आयुष्यात जे काही आहे ते सर्व या गुरूंमुळे आहे याची कृतज्ञता आपण बाळगली पाहिजे.
माझ्या आयुष्यात देखील मी जे काही २ शब्द लिहू इच्छितो आहे त्यात काही चुकले तर जबाबदारी माझी परंतु चांगले वाटेल त्या सर्वांचे श्रेय माझ्या गुरूंचे...
अर्थात योगसाधना आणि योगस्थ मती चा अभ्यास केल्यानंतर अर्जुनाच्या शंका आणखीच वाढल्या ! स्वतः बद्दल , आणि आपल्या वृद्धीबद्दल आपल्याला ज्ञान मिळताच स्वतः सोबत आता संपूर्ण विश्वातील शंका आपल्या मनात येतात.
आणि आपल्या प्रत्येक शंकेला भगवंताकडे उत्तर असते.
इतेच सहावा अध्याय - आत्मसंयमयोग समाप्त होतो आणि भगवंत जगाबद्दलच्या शंकांचे निराकरण अध्याय सातवा ज्ञानविज्ञानयोगावाच्या माध्यमातून सांगण्यास सुरुवात करतात ...



Comments