अध्याय सातवा - ज्ञानविज्ञानयोग / विज्ञानयोग
- Alap Phadke
- 22 hours ago
- 4 min read
Updated: 5 hours ago
आपण सर्वांनीच अर्जुनाप्रमाणे आधीच्या सहा अध्यायांतून आपल्या स्वतःबद्दल, कर्माबद्दल , आत्म्याबद्दल महान ज्ञान मिळविण्याचा प्रयत्न केला.
अनादिकालापासून आपल्या सारख्याच अनेकांना जन्म देणाऱ्या आणि आपल्यासारख्याच कित्येकांना सामावून घेणाऱ्या या प्रचंड सृष्टीचे ज्ञान भगवंताने या सातव्या अध्यायात सांगितले आहे.
तर चला आपण सर्वजण अशाच संयमाने, विनम्रतेने आणि भक्तीने या सृष्टीचे गूढ जाणून घेण्याचा प्रयत्न करू आणि सुरु करू
अध्याय सातवा - ज्ञानविज्ञानयोग
१. सृष्टीची उत्पत्ती कशी झाली ? याचा नक्की अर्थ कोणता ?
अमुक वर्षांपूर्वी सृष्टीची निर्मिती अमुक अशा स्फोटांमुळे किंवा प्रक्रियांमुळे झाली हे आपलं आधुनिक पांडित्य झालं अर्थात विज्ञानाच्या दाखल्यांप्रमाणे ते बरोबर आहे देखील परंतु या सर्वांचे मूळतत्व काय याचा विचार आपण केला का ?
भगवंत म्हणतात कि ,
"जेणें सांगतयाचें बोलणें खुंटे । ऐकतयाचें व्यसन तुटे ।
हें जाणणें सानें मोठें । उरों नेदी ॥"
अर्थात - अशी जी गूढ मुद्याची गोष्ट आहे, ती शब्दात आणली जाईल व त्याच्या थोड्या प्रतिपादनानेच मनातील पुष्कळ इच्छा तृप्त होतील. (म्हणजे मनाचे पूर्ण समाधान होईल).
जशी शरीराची सावली पडते तशीच माझी सावली किंवा माझी माया म्हणजे हि सृष्टी किंवा प्रकृती !
आठ भागांमध्ये असल्यानेच याला अष्टधा प्रकृती असे देखील म्हणतात !
पृथ्वी, जल, तेज, वायू, आकाश, मन, बुद्धी आणि अहंकार !
यातील पृथ्वी, जल, तेज, वायू, आकाश यांनाच आपण पंचमहाभूते असे म्हणतो यातूनच चैतन्याची अर्थात जीवाची निर्मिती होते. यालाच मनाची जोड मिळते आणि बुद्धी निर्माण होते . पुढे हि बुद्धी अनेक गोष्टी जाणून घेण्याचा प्रयत्न करते आणि त्यातूनच निर्माण होतो तो म्हणजे अहंकार !
पुढे भगवंत म्हणतात कि असे अनेक जीव या सृष्टीत निर्माण होतात आणि ६४ लक्ष योनींमध्ये विभागले जातात !
आणि मग या एवढ्या सगळ्यात भगवंताला कुठे शोधायचे ?
२. भगवंत कुठे असतो ?
अष्टधा प्रकृतीने जीव तयार होतो अर्थात या जीवाची सुरुवात , मध्य आणि शेवट प्रत्येक गोष्टीत भगवंत आहे.
ऋषींच्या तपामध्ये, योध्याच्या बलामध्ये, पाण्याच्या थेंबात, ज्ञानी माणसाच्या बुद्धीत, वाऱ्याच्या वेगात, चंद्रसूर्याच्या प्रकाशात अर्थात सृष्टीच्या कणा कणात भगवंत आहे!
आता थोडं आपल्या काळाप्रमाणे पाहिलं तर आपल्याला सभोवताली सजीव आणि निर्जीव अशा दोन गोष्टी पाहायला मिळतात सजीव गोष्टींमध्ये तर जीव असतोच परंतु निर्जीव गोष्टींना सुद्धा हालचाल करण्यासाठी आपल्याला उदा. गाडी चालण्यासाठी, विमान उडण्यासाठी आहोत इतकंच काय तर एखादे लहान खेळणे आपल्याला त्यात इंधन किंवा बॅटरी ची आवशयकता असतेच ना ? अर्थात ऊर्जा दिल्याशिवाय मिळाल्याशिवाय कशालाही अर्थ नाही आणि हीच ऊर्जा
ज्याला एनर्जी म्हणजेच भगवंत !
मग आता भगवंत कुठे नाही ?
श्रीकृष्ण म्हणतात कि सत्व, रज, तम हि तिन्ही तत्वे जरी त्यांनी निर्माण केली असली तरी यात तो नाही.
ज्या प्रमाणे आकाशात ढग असतात परंतु ढगात आकाश नसते त्या प्रमाणे त्यानेच निर्माण केलेले असले तरीही भगवंतात विकार नाहीत.
परंतु आपल्याला देखील देवाने निर्माण केले आहे मग आपण त्याच्याशी एकरूप का होऊ शकत नाही त्याचे कारण असे कि,
"पैं पृथ्वीयेचा घटु कीजे । सवेंचि पृथ्वीसि मिळे तरी मेळविजे ।
एर्हवीं तोचि अग्निसंगें सिजे । तरी वेगळा होय ॥"
अर्थात - जसे मातीचे मडके करावे व ते केल्याबरोबर (कच्च्या स्थितीत) मातीशी मिळवले तर मातीत मिळून जाते. पण ते मडके भाजले असता ते मातीशी न मिळता खापररूपाने वेगळे रहाते.
म्हणजेच आपण या सृष्टीत आलो कि आपण अहंकाराच्या दाहकतेत निष्टुर आणि कठीण होतो कि आपण परमेश्वराशी एकरूप होऊ शकत नाही !
यात सांगताना भगवंत म्हणतात कि
"एकदा अहंकाराचं आणि शरीराचं प्रेम जमलं ,
त्यांना इच्छा नावाची मुलगी झाली.
इच्छेने पुढे जाऊन द्वेषाशी लग्न केलं ,
त्यांना मोह नावाचा मुलगा झाला,
या मोहाला त्याच्या आजोबांनी अर्थात अहंकाराने वाढविले ! "
नंतर असं झालं कि
या मोहाला चांगल्या मार्गावर पाय ठेवण्याचे धैर्य होत नव्हते आणि मग
वाईट गोष्टींनी ग्रासून त्याने चांगल्या मार्गावर वाईट प्रवृत्तीचे काटे पेरले.
आणि या काट्यांच्या जाळ्यात आपण सगळेच अडकलो आहोत नाही का ?
याच काट्यांच्या मायाजाळाला माऊली "माया नदी" असे संबोधतात !
तर मग आपल्याला प्रश्न पडला असेल कि या माया नदीतून पलीकडे कसं जायचं ?
३. हि माया नदी पार कशी करावी ?
हि माया नदी पार करण्यासाठी अशक्य गोष्टी आपल्याला शक्य कराव्या लागतील !
हे आपण करू शकतो का ?
पथ्य न पाळता आजार बरा होऊ शकतो का ?
एखादा लोभी मनुष्य आयते आलेले धन परत करेल का ?
जाळ्यात अडकलेलं हरीण जाळ कुरतडून बाहेर पडेल का ?
नाही ना ?
पुढे माउली म्हणतात कि यासाठी आपण योगस्थ व्हावे ! योग धारणा करावी!
ज्या माणसाने योग धारणा केलेली असते, जो ज्ञान संपादन करून आपले कर्म करत असतो त्याला हि नदी पार करावी लागत नाही.
नदीचे पाणी आपोआप आटत आणि योगस्थ व्यक्ती सहजपणे त्यातून जाऊन भगवंताशी एकरूप होतात..
एकदा प्रयत्न करून पाहूया ! असे अनेक वैयक्तिक अनुभव मला आले अगदी आत्ता ज्ञानेश्वरीचे लेखन करण्यास सुरुवात केली आणि पर्वत एवढे वाटणारी संकटे हळू हळू विरळ होऊन नाहीशी झाली.
"The Secret" सारख्या सिनेमात पाहून आपण सर्वच जण "Positive Energy , Law of Attraction" याचे प्रयोग करून पहिले ना ? त्यावर विश्वास ठेऊ लागलो ना ? मग आपल्याच प्राचीन आणि महान ज्ञानावर विश्वास ठेऊन एकदा प्रयत्न करून पाहूया तरी !
४. भक्तांचे चार प्रकार !
तर असे अनेक जण ईश्वराशी एकरूप होण्याचा प्रयत्न करतात, ईश्वराची भक्ती करतात अशा भक्तांमध्ये देखील फरक असतो असे माउली म्हणतात !
- आर्त भक्त म्हणजे केवळ आपली दुःखे नाहीशी करण्यासाठी ईश्वराची प्रार्थना करणारे.
- जिज्ञासू भक्त म्हणजे खरोखर ईश्वर आहे का याचा शोध घेऊ पाहणारे .
- अर्थार्थी भक्त म्हणजे केवळ धानाच्या हव्यासाने किंवा आर्थिक लाभासाठी ईश्वराला मागणे करणारे.
-ज्ञानी भक्त म्हणेज खरे भक्त ! जे ज्ञान प्राप्त करतात, कर्म करतात, योगस्थ होतात आणि ईश्वराला संपूर्णपणे समजून घेण्याचा प्रयत्न करतात .
भगवंत म्हणतात ,
"तेषां ज्ञानी नित्ययुक्त एकभक्तिर्विशिष्यते ।
प्रियो हि ज्ञानिनोऽत्यर्थमहं स च मम प्रियः ॥"
अर्थात - त्यामध्ये नित्य व माझ्याशी अनन्य होऊन भक्ति करणारा ज्ञानी श्रेष्ठ होय. कारण ज्ञानी मनुष्याला
अत्यंत प्रिय वस्तु मी आहे व मला तो अत्यंत प्रिय आहे.
असा भक्त हा परमेश्वराला अत्यंत प्रिय असतो.
हे महाज्ञान ऐकून अर्जुन भारावून गेला, अर्जुनाला आणखी उत्सुकता निर्माण झाली,
या सृष्टी पलीकडे जाऊन अजून ज्ञानार्जन करण्याची इच्छा झाली
आणि इथेच सांगता झाली ज्ञानेश्वरीचा सातवा अध्याय - ज्ञानविज्ञानयोग अर्थात विज्ञानयोगाची.
आणि भगवंत तर अर्जुनाला पुढील अध्याय सांगण्यास सज्ज होतेच !
माउली म्हणतात कि ,
" तिये अवधान द्यावें गोठी । बोलिजेल नीट मर्हाटी ।
जैसी कानाचे आधीं दिठी । उपेगा जाये ॥ "
अर्थात - पुढील हा अध्याय समजताना बुद्धीच्या जिव्हेने शब्दाचा मतलब न चाखता, केवळ अक्षरांच्या शोभेने इंद्रिये जगतील. (इंद्रियांचे समाधान होईल).
तर भगवंताने अध्याय आठवा "ब्रह्मक्षरनिर्देशयोग" सांगण्यास सुरुवात केली.



Comments