top of page
Logo - DWA (1).png
Logo - DWA (1).png

Hey! So Glad You're Here.

सध्या मुंबापुरीत (मुंबईत) किंवा कोणत्याही शहरात आपले दैनंदिन काम, कौटुंबिक जीवन आणि इतर सामाजिक जीवन यशस्वी किंवा अयशस्वी पणे आपण सर्वच जण जगत असतो. या सगळ्यातून विश्रांतीसाठी कुठे ना कुठे पिकनिक / सहल आपण काढत असतोच त्याच प्रमाणे कोणत्याही प्रकारची पूर्वनिश्चित योजना / नवस आणि  उद्देश नसताना कुठेतरी फिरायला जायचे अशाप्रकारचा विचार मनात आला आणि ऑफिस मधील काही सहकाऱ्यांसोबत विविध मंदिरात जाण्याचे नक्की झाले. आणि अशाच प्रकारे जुलै २०२३ मध्ये पहिल्यांदाच श्रीक्षेत्र पंढरपुरात जाऊन विठू माऊलींचे दर्शन घेण्याचा योग आला.

माहित नाही का परंतु त्या घटनेपूर्वी विठ्ठल किंवा संत परंपरा / वारकरी / वारी या कोणत्याच गोष्टीबद्दल फारसे आकर्षण किंवा माहिती देखील नव्हती. पंढरपुरात पोचलो आजकालच्या पद्धतीनुसार सोयीने लगेच दर्शन व्हावे यासाठी मंदिर समितीत ओळख काढून थेट (VIP ) दर्शन घेतले आणि आपल्या पुढील मार्गाला लागलो. 

 

आता या लेखनाची सुरुवात अशा पद्धतीच्या माझ्या वैयक्तिक प्रसंगातून करण्यासाठी मी कोणी साहित्यिक नाही अथवा लेखक नाही परंतु या एका दर्शनाच्या प्रभाव जो पडला त्याने आयुष्याकडे बघण्याचा संपूर्ण दृष्टिकोन बदलत गेला. का माहित नाही परंतु तेथे त्या जागेबद्दल आकर्षण निर्माण झालं. 

मंदिरात प्रवेश केल्यानंतर "आपला देव गेली २८ युगे याच वास्तूत विटेवर उभा आहे" या कल्पनेनंच भारावून गेलो. 

या गोष्टीला आमची पिढी "Good / Positive Vibes" असं नाव देते परंतु शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरेंच्या भाषेत सांगायचं तर त्या मंदिरातील भिंतीला स्पर्श केल्यावर या भल्यामोठ्या आणि महान श्रद्धेच्या परंपरेचा प्रवाह नकळत तुमच्या मनात प्रवेश करतो. 

 

 

या नंतर आयुष्यात अनेक उलथापालथ करणाऱ्या घटना घडल्या... चांगल्या वाईट सर्व प्रसंगातून जात होतो. 

त्यातच मागील वर्षी वारीला जाण्याचा योग आला. केवळ एक आठवडा आधी सगळं ठरवून वारीला आलो आणि अनेक गोष्टींचा उलगडा झाला. 

निस्वार्थ भक्तीच्या महासागरात आल्याचा अनुभव आला.  

संपूर्ण जनसमुदाय कोणी आपली सगळी मानसिक दुःख विसरून वारीत सहभागी झाला होता तर कोणी आपली सगळी भौतिक सुख विसरून पायी पांडुरंगाच्या दर्शनाला आला होता. आणि तिथे पुन्हा एकदा फक्त आणि फक्त भक्तीचा अनुभव आला. 

 

कोणतेही कर्मकांड नाही, भक्तीचा देखावा नाही, कोणी गरीब नाही ना कोणी श्रीमंत केवळ त्या पांडुरंगाच्या प्रति भक्ती संपर्पण... 

आणि हेच हेच आपल्या पुराणात गीतेत सांगितले नाही का ? 

परंतु आपले पूर्ण, परंपरा याचा करा अर्थ आमच्या पिढी पर्यंत पोचतच नाही आणि पोचला तर उमगत नाही... 

देवाच्या निस्वार्थ भक्तीपेक्षा सार्वजनिक उत्सव वाढले आणि देवाच्या आशिर्वादापेक्षा आयोजकांची प्रतिष्ठा महत्वाची झाली. 

असो त्या सगळ्यावर भाष्य करण्याची ना मला इच्छा , ना माझी योग्यता !  

 

मुंबईत गेल्यावर कधीतरी वाचू म्हणून पंढरपूर येथून मी श्री ग्रंथराज ज्ञानेश्वरी खरेदी केली होती. घरी आणून ठेवली परंतु वाचण्याचा योग काही आला नाही. 

परंतु जेव्हा वाचून त्याचा अर्थ हळू हळू समजून लागतो आहे तेव्हा असं अनेक गोष्टींकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलतो आहे. अनेक गोष्टींचा खराखुरा अर्थ उमगतो आहे. 

 

आणि म्हणूनच मला उमगलेल्या या महान रचनेचा अर्थ लिहून ठेवावा आणि या वर्षी २०२५ ला वारीला भेटायला जाताना श्री विठ्ठलाच्या चरणी चंद्रभागेत हे लेखन अर्पण केले. 

आणि यासोबतच काहीतरी लिहावे, आपल्याला मिळालेले विविध क्षेत्रातील ज्ञान आपल्या लोकांसह वाटून घ्यावे याच उद्देशानं "Alap Phadke's Blog" ची सुरुवात करत आहे. 
काही चुकले, विचार पटले नाहीत तर पदरात घ्या आणि माझ्या ब्लॉग संदर्भातील आपले विचार नक्की माझ्यापर्यंत पोचवा! 

bottom of page