top of page
Logo - DWA (1).png
Logo - DWA (1).png

अध्याय आठवा - ब्रह्माक्षरनिर्देशयोग

  • Writer: Alap Phadke
    Alap Phadke
  • 2 hours ago
  • 4 min read

आपण सातव्या अध्यायात या सृष्टीची निर्मिती आणि त्यातील जीवांचे विज्ञान समजून घेतले, 

हे सर्व ऐकल्यावर अर्जुनाची उत्सुकता आणखी वाढली आणि भगवंताला आणखी आणखी उपदेश करून ज्ञान देण्याची विनंती केली. 

याच वेणी श्री कृष्णाने अर्जुनाला आणखी गहन परंतु रोचक अशा ज्ञानाचा उपदेश करण्यास सुरुवात केली. 

माउली याबद्दल म्हणतात कि 

" तिये अवधान द्यावें गोठी । बोलिजेल नीट मर्‍हाटी ।

जैसी कानाचे आधीं दिठी । उपेगा जाये ॥ " 

अर्थात - पुढील हा अध्याय समजताना बुद्धीच्या जिव्हेने शब्दाचा मतलब न चाखता, केवळ अक्षरांच्या शोभेने इंद्रिये जगतील. (इंद्रियांचे समाधान होईल). 


आपण प्रश्नांची उत्तरे शोधण्यापेक्षा केवळ ज्ञानार्जनाच्या इच्छेने जरी हा संवाद ऐकलं तरी आपल्या सर्व इंद्रियांचे समाधान होईल अर्थात आपल्याला अनेक गोष्टी यातून समजतील. 


पुढे माउली म्हणतात कि, 

"श्रीकृष्ण कोपोनि ज्यासी मारी । तो पावे परब्रह्मसाक्षात्कारीं ।

मा कृपेनें उपदेशु करी । तो कैशापरी न पवेल ॥"

अर्थात - श्रीकृष्ण रागावून ज्याचा वध करतात त्यास ब्रह्माचा साक्षात्कार होतो, मग ज्याला कृपेने उपदेश करतील तो ब्रह्मसाक्षात्काराला कसा पावणार नाही ? 


तर चला संयमाने आणि विनम्रतेने ज्ञान वेचण्याचा प्रयत्न करू आणि सुरु करू , 


अध्याय आठवा - ब्रह्माक्षरनिर्देशयोग !


१. ब्रहादेवाचा एक दिवस..

आपल्याला यासाठी सर्वप्रथम इंद्रदेव आणि चार युगांची माहिती हवी,

इंद्रदेव अर्थात देवांचा राजा , इंद्रदेव हा कोणी विशिष्ट देव नसून ते एक पद आहे त्यामुळे काळानुसार इंद्र हे बदलत असतात. 

चार युगे म्हणजे सतयुग , त्रेतायुग, द्वापरयुग आणि कलयुग ! 


अर्थात आपल्यापैकी अनेकांना या युगांची माहिती असेलच , हि चार युगे म्हणजे केवढा मोठा काळ परंतु आपल्याला माहिती आहे का कि या चारही युगांचे सहस्रावर्तन म्हणजे हि चारही युगे पूर्ण झाल्यावर एक चक्र पूर्ण होते आणि पुन्हा सतयुग सुरु होते अशी १ हजार चक्र अर्थात (सहस्रावर्तन) पूर्ण झाल्यावर ब्रह्मदेवाचा एक दिवस पूर्ण होतो. 

आणि आणखी एक सहस्रावर्तन अर्थात पुन्हा एकदा हजार वेळा युग घडून जातात तेव्हा एक रात्र पूर्ण होते. 

एवढंच काय तर स्वतः सर्व देवांचा राजा असणाऱ्या इंद्रदेव त्यांचे स्थान केवढे मोठे परंतु ब्रह्मा दिवसाच्या एका दिवसात सुमारे १४ इंद्र बदलतात ! 


आता विचार करावा कि एवढ्या मोठ्या आणि विशाल अनादी आणि अनंत ब्रह्मतत्वाचा आपण केवढा छोटासा किंवा मी तर म्हणेन नगण्य असा भाग आहोत तरी देखील भगवंताचा ध्यास केल्यावर तो आपल्या मदतीला धावून येतो म्हणजे त्याची लीला किती अगाध आणि प्रचंड असेल. 


आणि या भगवंताने गीतेसारखे आपल्या जीवनाचे अक्षरशः Manual आपल्यासमोर ठेवले आहे. ज्ञानेश्वरीच्या माध्यमातून माउलींनी ते अधिक सोपे करून आपल्याला सांगितले तर त्याच्या प्रत्येक शब्द आणि अक्षरातून ज्ञान वेचण्याचा प्रयत्न आपण करायला हवा.   


असो तर हा असतो ब्रह्मदेवाचा एक दिवस ! 


दिवसाची सुरुवात जेव्हा होते तेव्हा सृष्टीची उत्पत्ती होण्यास सुरुवात होते , जसे अनेक ढग एकत्र येतात त्या प्रमाणे अनेक ब्रह्मानंदांची निर्मिती होण्यास सुरुवात होते 

आणि जशी रात्र होऊ लागते तेव्हाच हि सृष्टी लोप पावू लागते. 

ज्या प्रमाणे एखादा महाकाय वृक्ष या मातीतून जन्म घेतो आणि अखेर त्याच मातीस जाऊन मिळतो तसेच या सृष्टीचे देखील आहे. अखेर सृष्टीत आणि त्यातील जीव लोप पावतात ! अर्थात त्यांचा मृत्यू होतो. 


२. मृत्यू नंतर काय ? 

 हे समजण्यासाठी आपल्याला काही शब्दांचे अर्थ माहित असणे आवश्यक आहे . हे शब्द कठीण वाटत असले तरी त्याचे अर्थ अतिशय सोप्या भाषेत उलगडण्याचा एक प्रयत्न करत आहे. 


परब्रह्म - म्हणजे मूळतत्व , ज्याला आकार नाही, नाव , रूप, रंग काहीच नाही असे निर्गुण - निराकार मूळ ब्रह्मतत्व म्हणजे परब्रह्म ! 


अध्यात्म - म्हणजे जे देहात असत आणि देहाच नाश झाल्यावर देखील नाश पावत नाही ते परमेश्वराशी जोडलेलं असत ! 


अधिभूत - म्हणजे थोडक्यात आपले शरीर , आणि मृत्यू नंतर नाश पावणारा मुख्य घटक म्हणजे अधिभूत ! 


अधिदैव - म्हणजे आपल्या शरीरातील आत्मा जो मृत्यूनंतर देखील चिरंतन राहतो ,

हाच खरा परमात्म्याचा अंश म्हणजे अधिदैव ! 


अधियज्ञ - म्हणजे भगवंत जो सृष्टीच्या प्रत्येक कणात आपल्या सर्वात आहे तो म्हणजे अधियज्ञ! 


तर ब्रह्मदेवाच्या दिवस आणि रात्रीच्या संकल्पनेमुळे भगवंताचे रूप हे व्यक्त, अव्यक्त, साकार आणि निराकार या स्वरूपात असत परंतु त्यामुळे मूळ परब्रह्म बदलत नाही. 

उदा. आपण सोन्याचे विविध अलंकार बनवतो तेव्हा सोन तो आकार घेत परंतु मूळ सोन हे तेच असत ! 


माउली तर म्हणतात कि, 

"जें हें विश्वचि होऊनि असे । परि विश्वपण नासिलेनि न नासे ।

अक्षरें पुसिल्या न पुसे । अर्थु जैसा ॥" 

अर्थात - अक्षरे मिटविले तरीही शब्दाचे महत्व टिकून असते त्याच प्रमाणे आपला आत्मा हा चिरंतन आहे. शरीर संपलं तरीही आत्मा संपत नाही. 


कर्मयोगात सांगितल्या प्रमाणे जे योगस्थ असतात , ज्ञानार्जन करतात, नित्य नेमाने आपल्या कर्माचे पालन करतात त्यांना मृत्यूची जाणीव देखील होत नाही कारण ते आधीच परमात्म्याशी एकरूप झालेले असतात. 


याचे माउली अतिशय समर्पक उदाहरण देतात ते म्हणजे " जर एक माठ पाण्यात टाकला तर त्याच्या आत आणि बाहेर दोहोंमध्ये पाणी असत त्यामुळे तो घडा फुटला तरीही पाण्याला काही फरक पडत नाही ! अशाच प्रकारे आपण मनाने योगी होऊन ईश्वराला एकरूप होण्याचा प्रयत्न केला तर आपल्या मृत्यू नंतर आपण ईश्वरालाच जाऊन मिळू. 


भगवंत म्हणतात, 

"म्हणौनि तूप होऊनि माघौतें । जेवीं दूधपणा न येचि निरुतें ।

तेवीं पावोनियां जयातें । पुनरावृत्ति नाहीं ॥ "

अर्थात - ज्याप्रमाणे दुधाचे तूप झाल्यावर पुन्हा त्या तुपाला दूधपणा खात्रीने येत नाही त्याप्रमाणे ज्या परमात्मस्वरूपास पावल्यावर पुन्हा जन्म नाही. 

पुनर्जन्म नाही याचाच अर्थ आपण नेहमीच भगवंतासोबत राहू हा होय. 

म्हणून भगवंत अर्जुनाला सांगतात कि तू तुझं काम निष्ठेने करत राहा आणि या युद्धात मृत्यू जरी आला तरी तू येऊन मलाच मिळशील ! 



३. अहंकार 

या ईश्वराशी एकरूप होण्याच्या प्रक्रियेतील सर्वात मोठा अडथळा म्हणजे अहंकार होय आपण विज्ञानयोगात देखील या अहंकारामुळे काय होत ते पाहिलं ! 


अधिदैव अर्थात आपला आत्मा जो परमात्म्याचा अंश आहे परंतु तो अहंकाराने वेढलेला असतो, याचेच उदाहरण देताना माउली म्हणतात कि , 

एखादा स्फटिक म्हणजेच क्रिस्टल जर केसांच्या गुंत्यात ठेवला तर त्याला तडे गेले आहेत असे भासते परंतु तो गुंता बाजूला केला कि आपल्याला सत्य परिस्थिती समजते. 


त्याच प्रमाणे माणसाने अहंकार बाजूला सरावा. 

ज्या व्यक्तीला अहंकार नाही, जो ज्ञानार्जन करतो, आपले कर्म करतो जो योगस्थ आहे त्याला मृत्यूसमयी घाबरण्याचे कारण नाही कारण तो आधीच माझ्याशी एकरूप झालेला असतो . 


हेच अफाट ब्रह्मज्ञान समोर आल्यावर अर्जुनाची उत्सुकता , ज्ञान ग्रहण करण्याची आस अधिक वाढली , त्याच्या सारख्याच आपल्याला देखील अनेक शंका नक्की मनात असतील. 

यातील अनेक शंका अर्जुनाने भगवंतासमोर मांडल्या आणि अध्याय आठवा - ब्रह्माक्षरनिर्देशयोगाची सांगता झाली. 


अर्जुनाची उत्कंठा पाहून पुढे भगवंताने त्याला ज्ञानाची आणखी भंडारे उघडून देण्यास सुरुवात केली. आणि अध्याय नववा राज्यवैद्यराजगृह्ययोग सांगण्यास सुरुवात केली. 

या वेळी हे भांडार होते स्वतः ईश्वराबद्दल !

त्यासोबतच अर्जुनाला एक अतिशय महत्वाचे गुपित देखील श्रीकृष्णाने सांगितले. 



 
 
 

Comments

Rated 0 out of 5 stars.
No ratings yet

Add a rating
bottom of page