अध्याय नववा - राजविद्याराजगुह्ययोग
- Apr 22
- 5 min read
आत्तापर्यंत या ग्रंथराजाच्या अनेक अध्यायांतून स्वतःपासून ते ब्रह्माण्डपर्यंतच्या ज्ञानाचा उपदेश भगवंताने अर्जुनाला केला. अर्जुनाने देखील संयम आणि विनम्रता राखून या ज्ञानाचे ग्रहण केले.
परंतु आता वेळ होती ती ब्रह्माण्डाच्या देखील पलीकडे जाऊन साक्षात भगवंताला समजून घेण्याची !
आता या लेखनाच्या छोट्याश्या प्रयत्नांतून जेवढे शक्य होईल तितके सोप्या शब्दात मला जे उमगले
ते मांडण्याचा प्रयत्न केला आहे.
तर चला नेहमीसारखेच संयम आणि विनम्रतेने या उपदेष्टातून ज्ञानाचे कण वेचण्याचा प्रयत्न करू
आणि सुरु करू अध्याय नववा - राजविद्याराजगुह्ययोग...
१. भगवंत मूर्तीमध्ये असतो का ?
भगवंत केवळ मूर्तीमध्ये नाही तर भगवंत या सृष्टीच्या चराचरात आहे.
परमेश्वर म्हणतो कि मी निराकार आहे मला कोणताही आकार , रंग , रूप नाही . भक्त मला मूर्तीत शोधण्याचा प्रयत्न करतात, मी कधीच अपेक्षा केलेली नसतात मला नैवेद्य दाखवितात. या सर्वांमुळे भक्त प्रसन्न होतात...
तसेच जर माझी मूर्ती भंग पावली तर त्यात दैव नाही असे देखील म्हणतात !
या भगवंताच्या शब्दांचा जर आपण खरोखर नीट विचार केला तर आपण देखील तसेच वागत नाही का ?
गणेशोत्सवात ज्या मूर्तीला दैव मानून आपण त्याची प्राणप्रतिष्ठा करतो, त्याचे पूजन करतो तीच मूर्ती विसर्जित करताना आपण त्याचे पावित्र्य राखतो का ?
घरात बाप्पा असले कि आपण चुकीच्या आणि वासनेच्या गोष्टी (मद्यपान - मांसाहार) करणे टाळतो मग बाकी संपूर्ण वर्ष आपल्या वास्तूत भगवंत नसतात का ? ते आपल्याला बघत नाहीत का ?
मनुष्याने आपल्या कल्पनेप्रमाणे भगवंताची भक्ती करतो !
गणेशोत्सव अर्थात प्राचीन असे पार्थिव गणेशाचे व्रत आणि त्या संदर्भात प्रश्न उपस्थित करण्याची माझी कुवत नाही परंतु या गोष्टींचा विचार आपण केला पाहिजे ?
जगतगुरु तुकाराम महाराज म्हणाले होते कि परमेश्वराची भक्ती करण्यासाठी काहींनी परंपरा आणि ज्ञानाचे ग्रहण करून त्या ईश्वराची आराधना केली तर काहींनी लडिवाळपणे त्याला मिठी मारली !
भगवंत प्रत्येक गोष्टीत आहे परंतु आपल्याला त्याच्या अस्तित्वाची जाणीव असते का ?
एखाद्या माणसाच्या तळघरात सोन्यांच्या मोहोरांनी भरलेला घडा पुरलेला असतो आणि त्याची कल्पना नसल्याने त्यावरच मोडके तोडके घर बांधून मनुष्य संपूर्ण आयुष्य धनसाठी बाहेरचे जग भटकतो पण तरी दरिद्री जगतो.
असेच आपल्या आताच भगवंत अर्थात परमात्मा आहे आपण त्याचा शोध घेतला तर अगाध ध्यान आणि सामर्थ्याने आपले आयुष्य सुखाने भरून जाईल.
या गोष्टी येथे मांडत असताना माझे जे चुकत असेल ते मायेने संत आणि ईश्वर पदरात घेतील
अशी मला खात्री आहे आणि केवळ म्हणूनच हे धाडस करतो आहे.
२. मृत्युलोक
मृत्युलोक म्हणजे आपली पृथ्वी होय आता आपल्या पृथ्वीला मृत्युलोक का म्हणतात त्याचे कारण म्हणजे
या भूतलावर ज्याचा जन्म झाला आहे त्याचा मृत्यू निश्चित आहे.
इथे प्राप्त होणाऱ्या प्रत्येक सुखाला दुःखाची जोड आहे.
आपल्याला हवं ते आपण प्राप्त केलं तरीही मृत्यू नंतर ते आपल्या हातातून निसटून जाणार आहे.
म्हणून हा मृत्युलोक !
आता वास्तविक पाहता हे सगळं आपल्याला माहित असत परंतु तरी देखील आपण अज्ञानी माणसांसारखे वागतो
उदा. एखाद्या व्यक्तीचा मृत्यू होतो तेव्हा आपण अतोनात शोक करतो . त्या व्यक्तीसाठी अश्रू गाळतो ज्याने काहीच साध्य होणार नसते , ती व्यक्ती परत येणार नसते परंतु जेव्हा ती व्यक्ती जीवित असते तेव्हा आपण तिची तेवढी किंमत करतो का ?
तेव्हा जर आपण प्रेम सद्भावनेने त्या व्यक्तीशी वागलो तर चांगले नाही का ?
त्या सोबतच दुसरे अज्ञान म्हणजे आपला मोह !
माउलींनी अतिशय सुंदर उदाहरण दिल आहे ते म्हणजे साप बेडकाला खाण्यासाठी पकडतो परंतु त्या परिस्थितीत जर बेडकाला एखादी माशी दिसली तर तो ती माशी मिळविण्यासाठी धडपड करतो ! अर्थात मनुष्य सुद्धा शेवटच्या श्वासापर्यंत हव्यास आणि मोह यात अडकलेला असतो.
तर या परिस्थितीतून बाहेर पाडण्यासाठी काय करावे तर आपले उत्तम कर्म करत ज्ञान प्राप्त करत संयमाने जगत राहावे !
योग्य गोष्टी निवडून पुण्यकर्म करत राहावे.
३. स्वर्गलोक
स्वर्गलोक काय हे आपण सर्वांनाच ठाऊक आहे जिथे गंधर्वांचे सुंमधुर संगीत कानांवर पडते, रंभेसारख्या नर्तिकांचे नृत्य अनुभवायला मिळते,
उर्वशी सारख्या अप्सरा आपले मनोरंजन करतात, सर्व कार्य करण्यासाठी दूत असतात.
तर अशा या स्वर्गलोकाच्या सुखात आपण दंगून जाऊ.
परंतु इथे आपण कधीपर्यंत राहू शकतो ? जो पर्यंत आपल्या पुण्याचा साठा संपत नाही तो पर्यंत ! तो एकदा संपला कि पुन्हा जन्म घेऊन मृत्युलोकात यावे लागते !
अनेकदा लोक परमेश्वराची भक्ती करतात परंतुअपेक्षा स्वर्गलोकाची असते अशा वेळी स्वर्ग लोक प्राप्त होतो देखील परंतु एकदा पुण्याचा साठा संपला कि पुन्हा मृत्युलोकात येऊन जन्माचा फेरा पूर्ण करावा लागतो.
मग अशा वेळी आपण काय करावे तर आपण आपले कर्म करत राहावे, ज्ञान प्राप्त करत राहावे आणि संयम ठेवावा अर्थात मनाने योगी व्हावे आणि आपली कर्तव्ये पार पाडावीत. असे केल्यास आपण ईश्वराशी एकरूप होऊ आणि हाच खरा स्वर्ग !
४. भगवंताला कोणावर प्रसन्न होतो ?
भगवंताचा एक परमभक्त अर्थात भक्त प्रह्लाद हा राक्षस कुळात जन्माला आला त्याची पिता हिरण्यकश्यपू हे राक्षस राज होते परंतु तरी देखल भक्त प्रह्लाद हा विष्णुभक्ती करत असत ! याचा त्याच्या वडिलांना प्रचंड संताप आला आणि त्याच वेळी भगवंताने हिरण्यकश्यपू चा वध करण्यासाठी आणि आपल्या भक्ताचे रक्षण करण्यासाठी नरसिंह अवतार धारण केला !
हि कथा आपण सर्वांना माहित असेलच ती सांगण्याचा उद्देश असा कि भगवंत हा कोणतेही कुळ, जात पाहून प्रसन्न होत नाही. राक्षस कुळात जन्मलेल्या आपल्या भक्ताचे रक्षण देखील भगवंताने केले.
तर अशा या भगवंताला आपण काय अर्पण करावे ?
भगवंत म्हणतात कि आपले कर्म मला अर्पण करा तीच माझी खरी भक्ती !
भगवंत म्हणतात धन, अलंकार आणि तत्सम गोष्टींनी भगवंत प्रसन्न होत नाही शुद्ध भावनेनं साधं फुल जरी भगवंताला अर्पण केलं तरी त्याला ते प्रिय असत.
अहो म्हणूनच तर समस्त त्रैलोक्याचा राजा आणि लक्ष्मीपती असणाऱ्या भगवान श्रीकृष्णाने सुदाम्याने दिलेले पोहे अतिशय चवीने खाल्ले ना ?
अहो एवढंच कशाला तर एकदा एका मत्स्य पकडणाऱ्या मानवाने पंढरपुरात विठ्ठलाच्या चरणी भेट म्हणून मासे अर्पण केले ! आता मंदिरात हे मासे अर्पण केल्याने इतर लोकांनी त्या माणसाला हलकूल लावले परंतु स्वतः पांडुरंग प्रकट झाले आणि शुद्ध भावनेनं अर्पण केलेले हे मासे त्या विधात्याने स्वतःच्या कानात कायमचे धारण केले !
तर मित्रांनो महत्वाचे काय तर आपली भावना !
मी पुन्हा सांगतो मोठाल्या गूढ परंपरा, यज्ञ किंवा व्रतवैकल्ये या संदर्भात भाष्य करण्याची माझी कुवत नाहीच ती सर्व महान कार्य आहेतच परंतु जो भक्तीचा मार्ग मला सापडला तो म्हणजे शुद्ध भावनेनं आपल्याला जे वाटत ते भगवंताला अर्पण करावं !
आणि आज हा जो काही छोटासा लेखनाचा प्रयन्त आहे तो देखील त्या विठुरायाच्या आणि संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माउलींच्या चरणी अर्पण..
५. अर्जुनाला सांगितलेलं गुपित
भगवंत म्हणतात कि
आकाशने सर्वत्र असावं,
पाण्याने आभाळातून कोसळावं,
वाऱ्याने कधीच एका जागी थांबू नये,
पर्वतांनी जागचे हलू नये,
समुद्राने आपली मर्यादा सोडू नये
हि सगळी या सृष्टीला माझीच आज्ञा आहे !
भगवंत सूर्यरूपाने तापतात आणि पर्जन्यरूपाने बरसतात !
हि सृष्टी म्हणजे परमेश्वराची सावली आणि आणि यातल्या प्रत्येक जीवात भगवंत आहे.
ते जीव भिन्न भिन्न आहेत, त्यांच्या वृत्ती भिन्न आहेत परंतु ज्या प्रमाणे सूर्याची किरणे भिन्न तरी सूर्य एकाच आहे किंवा फांद्यांचे आकार भिन्न तरीही वृक्ष एकचं आहे तसाच तो परमात्मा देखील एकचं आहे ! तेच मूळतत्व ईश्वर आहे.
याच संपूर्ण सृष्टीमध्ये भगवंत आहे हे समजून प्रत्येकाला नमन केले जाते अर्थात वारीत आपण पाहतोच कि वारकरी बांधव एकमेकांच्या पाय पडतात.
तर मग या भगवंताच्या भक्तीचे सर्वात मोठे गुपित म्हणजे चराचरात भगवंत आहे या भावनेनं आपले कर्म केले तर वेगळी उपासना करण्याची गरजच आपल्याला पडणार नाही !
आपण योग्य ते निवडणे अतिशय आवश्यकक आहे ! भुंगा आणि बेडूक एकाच सरोवरात असतात परंतु भुंगा हा कमळातील परागकण वेचतो तर बेडूक हा चिखलाची निवड करतो !
आपण योग्य कर्म करत राहावे , ज्ञान संपादन करावे, सृष्टीतल्या प्रत्येक गोष्टीकडे डोळस पणे पहावे आणि चराचरात भगवंत असल्याप्रमाणे अहंकार न बाळगता मनाने योगी व्हावे हे जर आपल्याला करता आले तर आपली वृद्धी निश्चित आहे !
याच सर्व गोष्टींसोबत या महान अध्याय राजविद्याराजगुह्ययोग याची सांगता होते या सोबतच या महान श्रीमद भागवत गीतेचा तथा या ग्रंथराज ज्ञानेश्वरीचा पूर्वार्ध समाप्त होतो आणि भगवंताचे अधिक सामर्थ्य आणि त्याच्या विभूतीबद्दल श्रीकृष्ण अर्जुनाला उपदेश करतात त्या अध्याय दहावा "विभूतियोग" या सोबत या गीतेचा उत्तरार्ध सुरु होतो.
मित्रांनो म्हणता म्हणता या ग्रंथराजाच्या उत्तरार्धाच्या सीमेवर आपण येऊन पोचलो ,
मला कल्पना आहे कि अजून देखील अनेक शंका , प्रश्न आपल्याकडे आहेत पण पूर्वीच माउलींनी सांगितल्याप्रमाणे संयम ठेवल्याशिवाय ज्ञानाची प्राप्ती होणार नाही !
अनेक गोष्टी आपल्याला लगेच उमगणार नाहीत परंतु तरीही या गीतेच्या , ज्ञानेश्वरीच्या नुसत्या श्रवण / वाचनाने देखील आपली इंद्रिये तृप्त होतात त्यामुळे संयम ठेवावा आणि जास्तीत जास्त ज्ञानाचे कण वेचण्याचा प्रयत्न करावा...



Comments