top of page
Logo - DWA (1).png
Logo - DWA (1).png

अध्याय बारावा - भक्तियोग

  • Writer: Alap Phadke
    Alap Phadke
  • 3 hours ago
  • 4 min read

अर्जुनाला भगवंताने विश्वरूपदर्शन दिले त्यातूनच अनेक प्रश्नांची उत्तरे अर्जुनाला मिळाली, अर्जुन जणू या ज्ञानाच्या गंगेत स्नान करू लागला परंतु याच वेळी संपूर्ण त्रैलोक्य व्यापून टाकणाऱ्या या महाकाय रूपाची अर्जुनाला भीती वाटली. 


या रूपाचे दर्शन लाभणे हे अर्जुनाचे भाग्य आहे आणि त्याने या रूपाशी एकरूप व्हावे असा उपदेश भगवंताने केला. 


मग भगवंताने पुन्हा आपले श्रीकृष्ण अवताराचे मोहक रूप धारणा केले आणि अर्जुनाला विश्वरूपाशी , ईश्वराशी एकरूप कसे होता येईल याचा उपदेश करण्यास सुरुवात केली. 


भक्ती कशी करावी हा भगवंताचा उपदेश आजच्या काळात देखील तेवढाच समर्पक आहे ! आजच्या आपल्या तरुण पिढीला भक्तीचे ज्ञान भगवंताने दिले आणि माउलींनी ते अधिक सोपे करून सांगितले ! 


तर मग चला आपण सर्वजण देखील संयम ठेवून , विनम्रपणे  आणि अहंकार भाजूला सारून भगवंताला समर्पित होण्याचे अर्थात भक्ती करण्याचे मार्ग शोधण्याचा प्रयत्न करूया... 


सुरु करूया अध्याय बारावा भक्तियोग... 


१. भगवंत आपल्या भक्ताची काळजी कशी घेतो ? 

    हे मृत्युलोक अर्थात आपली पृथ्वी म्हणजे जन्म मृत्यूचा सागर आहे. हा महासागर कसा ओलांडायचा हे पाहून मनुष्य भयभीत होतो. 

अशा वेळी भगवंत स्वतःच्या नावाच्या होड्या बनवून पाठवतो... 

या होड्या म्हणजे आपल्या कठीण काळातील आधार... 

या होडीत बसणे अर्थात नामस्मरण करणे होय! मग भगवंत आपला नावाडी होतो आणि आपल्या सोबत राहून या महासागरात आपली काळजी घेतो ! 


किती सुंदर आणि सोप्या शब्दात सांगितले आहे ना ? 


एकदा आपण विचार करूयात कि हे उदाहरण देखील आजच्या काळात किती समर्पक आहे ! 

माउलींनी होड्यांना अवघड काळातील आधार का म्हणतात ? याचे उत्तर आपल्याकडे आहेच ते म्हणजे अवघड काळ आल्याशिवाय दैनंदिन जीवनात आपण किती वेळा शुद्ध भाक्तीने भगवंतांचे स्मरण करतो ? 


चांगल्या वाईट प्रसंगात आपण देवाकडे धाव घेतो परंतु नेहमीच दैनंदिन कार्यात प्रत्येक ठिकाणी भगवंत आहे हे समजून आपण कर्म केले तर किती सोपे होईल नाही का ? 



२. भक्ती कशी करायची ? 

  तर आपल्याला अवघड काळात आधार देणाऱ्या , जन्म मृत्यूचा महासागर ओलांडताना साथ करणाऱ्या भगवंतांची भक्ती आपण नक्की कशी करावी ? 

तर ते म्हणजे अहंकाराचा त्याग करावा आणि आपले कर्म करत राहावे ! 


आता आपण अहंकाराचा त्याग हे सर्व अध्यायात पहिले परंतु तो नक्की कसा करावा ? 


भगवंत म्हणतात ज्या प्रमाणे सूर्य अस्ताला गेला कि प्रकाश संपतो, त्याच प्रमाणे आपले मन आणि आपली बुद्धी हि भगवंताला अर्पण केली कि आपला अहंकार देखील संपतो ! 


आता हे कसे करायचे म्हणावे तर खूप सोपे आणि म्हणावे तर खूप कठीण तर यातच पुढे भगवंत म्हणतो कि संपूर्ण दिवसातील कशी क्षण आपण त्याला अर्पण करावेत 

जसा पौर्णिमेनंतर हळू हळू चंद्र छोटा होत जातो आणि अमावास्येला नाहीसा झालेला असतो तशी हळू हळू अहंकार देखील आपल्यातून नाहीसा होईल. 


हे हि नसेल तर भगवंत म्हणतो कि आपले कर्म उत्तमपणे करत राहा आणि कर्माचे फळ हे भगवंताला समर्पित करावे. 

हे समजावून सांगण्यासाठी माउली म्हणतात कि ज्या प्रमाणे बापाला स्वतःच्या मुलीबाद्द्ल वासना नसते त्याच प्रमाणे आपण केलेल्या कर्माचा कोणताही अहंकार आपण बाळगू नये ! 


आपले कर्म हे इच्छारहीत असावे म्हणजे आपल्याला अहंकार घेरणार नाही आणि आपण भगवंतांशी एकरूप होऊ शकू ! 


३. भगवंताला प्रिय असणाऱ्या भक्ताची लक्षणे ! 


अहंकार आणि इतर गोष्टींचा त्याग करायचा असेल तर हिमालयात तपश्चर्या करावी परंतु तेथे वास्तव्य करणे हे अतिशय कठीण असते त्याहून तेथे जीवाला धोका देखील असतो. 

दुसरा उपाय म्हणजे गंगेमध्ये स्नान करावे परंतु तेथेही आपण बुडण्याचा धोका असतो मग अशा वेळी अहंकाराचा त्याग करून भक्तिमार्गाला कसे लागावे ? तर सोपा उपाय म्हणजे भगवंताला प्रिय असलेल्या संत सज्जनांशी संगत करावी. हे कार्य हिमालयात वास्तव्य करण्यासारखे कठीण नाही आणि संतांचे मन अतिशय खोल असले तरी गंगेमध्ये बुडण्यासारखा धोका येथे नाही ! 


किती सुंदर आणि सोप्या शब्दात या महान गीतेने आपल्याला जीवनाचे सार सांगितले आहे ना ? या लेखनात प्रत्येक क्षणी आपल्या जन्मात हे ज्ञान आपल्या नुसत्या कानावर पडले याचेच सार्थक जाणवत आहे. 


तर मित्रांनो आजच्या काळात असे संत सज्जन कसे शोधायचे ? कोणाची संगत करावी ? 

तर हे ईश्वराला प्रिय असणाऱ्या भक्तांची कित्येक लक्षणे भगवंताने सांगितली आहेत परंतु त्यातील काही निवडक आणि आजच्या काळाला समर्पक अशी मांडण्याचा प्रयत्न करतो ! 


- यांचा स्वभाव अतिशय शांत असतो.  

- हे कोणत्याही परिस्थितीत भेदभाव करत नाहीत. 

- या व्यक्तींचं अस्तित्व हे नेहमीच हवं हवं असं वाटत अर्थात यांच्यातून Positive Vibes आपल्याला जाणवतात ! 

- हि मंडळी इतर जीवांना कंटाळत नाहीत सर्वांना आपलेसे करून घेतात ! 

- हे भक्त सूर्यासारखे निर्मळ असतात प्रसंगी दाहक जरी भासले तरी यांच्यात कपटरूपी अंधार किंवा नकारात्मकतेला जागा नसते. 

-हे स्थितप्रज्ञ असतात अर्थात अति आनंदी किंवा दुखी होत नाहीत. 

- हे कोणाचाही द्वेष करत नाहीत. 

- यांच्या मनात वासना नसते. 

- यांना भीती वाटत नाही. 

- प्रलय आला तरी सागरातील जीवांना त्याची भीती वाटत नाही आणि या जीवांचा देखील समुद्राला कधी त्रास होत नाही तसेच या भक्तांना समाजातील उन्मत्त माणसांचा किंवा व्यवस्थेची भीती / त्रास वाटत नाही आणि या व्यक्तींचा देखील कोणालाही उपद्रव होत नाही ! 

- आकाशाला ज्या प्रमाणे लेप लावता येत नाही तसेच स्तुती किंवा निंदा केल्याने या व्यक्तींना काही फरक पडत नाही ! 

- कुठेही घेऊ तरी तहान भागवण्यासाठी साधे पाणी सर्वांना हवे असते तशाच या व्यक्ती कोठेही गेल्या तरी सर्वांना हव्या हव्याश्या वाटतात. 

- तिन्ही ऋतूत आकाश सामान असत तसेच सर्व काळात हे भक्त स्थिर असतात ! 

-हे विश्वची माझे घर हा विचार घेऊन हे सर्वांना आपलेसे करतात. 

-यांना अहंकार शिवत सुद्धा नाही ! 


भगवंत म्हणतो कि माझं मूळ रूप हे निर्गुण आणि निराकार आहे परंतु या अशा भक्तांसाठी मी देह धारण करतो. ते मला शरण येतात आणि माझे ते रूप डोळ्यात साठवून उपकृत्य होतात. 


एवढंच नाही तर भगवंत म्हणतो कि जे माझ्या या भक्तांचे गोडवे गातात ते हि मला अत्यंत प्रिय असतात. 


याचेच उत्तम उदाहरण म्हणजे वारी ! ईश्वराशी एकरूप झालेल्या कित्येक संतांच्या पालख्या त्याचे गोडवे गात वारकरी पंढरीच्या वैकुंठात येतात आणि आपल्या संपूर्ण जगताचा राजा पांडुरंग प्रत्येक वारकऱ्याला आपले दर्शन देऊन त्यांचे कल्याण करतो ! 

पंढरपूर म्हणजे तर या जगतातील वैकुंठच ! 

ते म्हणतात ना


"आधी रचिली पंढरी , मग वैकुंठ नगरी... 

जेव्हा नव्हते चराचर, तेव्हा होते पंढरपूर.... 

जेव्हा नव्हत्या गोदा गंगा, तेव्हा होती चंद्रभागा....." 


याच चंद्रभागेच्या वाळवंटापर्यंत वारकरी येतात या सोहळ्यात एक वेगळीच ऊर्जा असते ! 

पांडुरंगाचे वेड असते, 

ईश्वराशी एकरूप होण्यासाठी भौतिक सुखाचा त्याग करून कर्म करत हे वारकरी येतात आणि पांडुरंगाच्या दर्शनाने उपकृत्य होतात . 


असे का होत असेल ? एवढी भक्तीची ताकद कुठून येते ? 

या भक्तिरसात न्हाऊन या भगवंतांशी आणि या प्रकृतीशी एकरूप कसे होता येईल ? 

अशा आणखी कित्येक प्रश्नांची उत्तरे भगवंत द्यायला सुरुवात करतात , 


येथेच अध्याय बारावा भक्तियोगाची सांगता होते आणि अध्याय तेरावा प्रकृतिपुरुषविवेकयोगाचा प्रारंभ होतो... 


 
 
 

Comments

Rated 0 out of 5 stars.
No ratings yet

Add a rating
bottom of page