top of page
Logo - DWA (1).png
Logo - DWA (1).png

अध्याय पाचवा - कर्मसंन्यासयोग / योगगर्भयोग

  • Writer: Alap Phadke
    Alap Phadke
  • 22 hours ago
  • 5 min read

आत्तापर्यंत पहिल्या चार अध्यायांमध्ये आपण आपल्या मनातील प्रश्न, ध्येयपूर्ती, आपले कर्म, कर्माचे फळ, त्यासाठीचे ज्ञान, आपला स्वधर्म अशा अनेक विषयांची ओळख करवून घेतली. 

वेगवेगळ्या योगांमध्ये आपल्याला जीवनाकडे पाहण्याचे भिन्न दृष्टिकोन मिळाले. आपण ज्ञान ग्रहण करावे, कर्म करावे, ध्येयप्राप्तीसाठी प्रसंगी आपल्याच लोकांशी संघर्ष करावा परंतु या सर्वच कधीच अभिमान करू नये! कोणत्याच फळाची अपेक्षा आपण करू नये ! 

असे परस्परांविरोधी भासणारे विचार उपदेश ऐकून आपल्यासारखाच अर्जुनाच्या मनात देखील संभ्रम निर्माण झाला परंतु हाच संभ्रम दूर करण्यासाठी आपण ज्ञान ग्रहण करावे हे देखील आपण शिकलो. 


हेच ज्ञान प्राप्त करत असताना आपण संयम ठेवला पाहिजे कोणतीही गोष्ट तात्काळ घडत नाही ! 

अर्धवट ज्ञान मिळविल्याने आपले नुकसानच होते या गोष्टी आपल्याला पक्क्या माहित झाल्या आहेत आणि म्हणूनच संपूर्ण भक्तीने आणि विश्वासाने अर्जुनाप्रमाणेच आपण सर्व या पाचव्या अध्यायापर्यंत येऊन पोचलो आहोत. 


या सर्व अध्यायातील उदाहरणे हि आपल्या अनेक विविध लोकांच्या विविध शंकांचे निरसन करणाऱ्या आहेत, जे जे ज्ञान मिळेल ते आपण ग्रहण करावे आणि आपल्या प्रश्नांची उत्तरे शोधावीत ! 


आपल्याला सांगण्यात आलेली हि कर्मयोग , सांख्ययोगाची शिकावं आचरणात कशी आणावी ? नक्की कोणत्या पद्धतींचे पालन करावे ? 

योग्य मार्गाची निवड यातील कोणती ? 

या सर्व प्रश्नांची उत्तरे भगवंताने अर्जुनाला सांगितली. मी तर म्हणेन कि आत्ता पर्यंत सांगितलेल्या विविध योगाचे ज्ञान आणि सार तसेच आचरण आणि सारासार विचार करण्याचा उपदेश भगवंताने आपण सर्वांना केला आहे. 


अर्थात ज्ञान आणि कर्म संयोग कसा साधावा ? यात कोणत्या गोष्टींची काळजी घ्यावी ? 

सांगण्यात आलेली लक्षणे ओळखून आपण स्वतःच्या आयुष्यात काय करतो अशी अनेक उत्तरे या पाचव्या अध्याय - कर्मसंन्यासयोग यात शोधण्याचा प्रयन्त करू... 


अज्ञानी माणसाची लक्षणे - 

सर्वात प्रथम आपल्याला ज्ञान मिळाले आहे का ? जर मिळाले असेल तर ते पुरेसे आहे का ? आणि आपले ज्ञान आपल्या ध्येयप्राप्तीसाठी उपयोगाचे आहे का ? 

हे सर्व प्रश्न आपण स्वतःला विचारायला हवेत. 

 भगवंताने आपल्याला अज्ञानी माणसाची अनेक लक्षणे सांगितली आहेत यातून बोध घेऊन आपण असे आचरण करत नाही ना याचा विचार आपण करावा. 

मी नेहमी प्रमाणे या अनेक लक्षणातील काही निवडक आणि आजच्या काळात संयुक्तिक आणि सोपी येथे मांडत आहे. 


हरणाला तहान लागते आणि हरण त्या तहानेने व्याकुळ होऊन मृगजळापाशी जाते आणि त्यामुळे नुकसान होत! अर्थात अज्ञानी माणूस आयुष्यात अनेकदा घाई करून चुकीच्या मार्गाची निवड करतो आणि त्यामुळे त्याला केवळ निराशा प्राप्त होते. 


आभाळाची सावली पडते तेव्हा खूप शांत वाटते परंतु हि सावली तात्पुरती असते , आभाळ ज्या प्रमाणे सावली देत तसेच ऊन - पाऊस सुद्धा देत असत ! म्हणूनच तर आपण घर बांधून राहतो ना ?  

या गोष्टींचा विचार न करता अज्ञानी माणूस क्षणिक सुखात अडकतो आणि भविष्याची चिंता करत नाही ! 


विषारी कांदे हे गोड असतात त्याची गोड चव माणसाला आकर्षित करते आणि कांद्यातील विष माणसाचे प्रचंड नुकसान करते तसेच आपल्या आजूबाजूच्या काही लोकांची गोड वाटणारे बोलणे आपल्यासाठी अतिशय धोक्याचे असते अशा चुकीच्या माणसाची निवड केवळ गोड बोलण्याने अज्ञानी माणूस करतो आणि त्याला भुलतो ! 


माशाला अमिश दाखवून गळ पाण्यात सोडण्यात येतो आणि लवकर मिळणाऱ्या परिणामांमुळे मासा गळ्याला लागतो. अज्ञानी माणूस देखील एखादी गोष्ट सोपी आणि लवकर प्राप्त करण्यासाठी अशा अमिषाला बळी पडतो आणि सर्व काही गमावून बसतो. 


- मनाची अस्वस्थता 

  आपले मन हे स्थिर नाही त्यामुळे आपण अज्ञानाकडे जातो आणि आपले नुकसान होते. 

आपले शरीर एकाच ठिकाणी असते परंतु मन अतिशय चंचल आहे ! विचार थांबत नाहीत , ते स्वप्न पाहतात आणि या स्वप्नात आपले मन अनेकदा सुख दुःखाचा अनुभव देखील गेहून येत ! त्यामुळे प्रत्यक्षात मन स्थिर कधीच राहत नाही आणि यामुळे माणसाला अज्ञान , अहंकार आणि भावना अशा गोष्टी ग्रासतात आणि त्याची अधोगती होते मग हे मन स्थिर कसे ठेवावे ? 


- मन स्थिर ठेवणे / ज्ञानी व्यक्तींची लक्षणे ! 

 सर्वात प्रथम म्हणजे प्रत्येक योगात / अध्यायात भगवंताने उपदेश केला तो म्हणजे स्वतःच्या इंद्रियांवर नियंत्रण ठेवणे होय . इंद्रियांवर नियंत्रण ठेवल्याने मनुष्य संपूर्ण जग पादाक्रांत करू शकतो. 


दुसरे लक्षण म्हणजे ज्ञानी माणसे नेहमीच सकारात्मक विचार करतात. 

"नातरी अंधकाराची वानी । जैसा सूर्यो न देखे स्वप्नीं ।

अमृत नायके कानीं । मृत्युकथा ॥"

अर्थात - सूर्याच्या मनात देखील कधी अंधार नसतो आणि अमृताला मृत्यू माहीतच नसतो . 


ज्ञानी माणसे कोणत्याही परिस्थिती भेदभाव करत नाहीत आणि त्यामुळे त्यांना कोणत्याही प्रकारचा अहंकार किंवा न्यूनगंड जाणवत नाही . 

आजचे स्वतःच्या आयुष्यातील उदाहरण घेऊन पहा आपण एखाद्याला तुच्छ समजतो तेव्हा आपल्या मनात अहंकार निर्माण होतो आणि एखाद्याला महान समजतो तेव्हा पाळ्या मनात न्यूनगंड अर्थात Complex निर्माण होतो. पण आपण सर्वांना सारखेच पहिले तर आपले मन केवढे स्थिर असेल आणि आपण योग्य निर्णय घेऊ शकू ! 


ज्ञानी माणूस हा प्रत्येक परिस्थितीत स्थिर असतो. अतिशय सुखाच्या प्रसंगात तो भारावून जात नाही आणि अतिशय दुःखात त्याचे मनोबल खचत नाही अशाच प्रकारची स्थिती आपण साधू शकलो तर आपण वृद्धी करू शकू !


महत्वाचे लासखान म्हणजे ज्ञानी माणूस केवळ चांगल्याच गोष्टी निवडतो आणि आत्मसात करतो . 

हि गोष्ट आजच्या पिढीसाठी आपण सर्वांसाठी केवढी महत्वाची आहे, माझ्या माहितीतनुसार कलयुगात एकाच मानवात म्हणजे आपल्या प्रत्येकात चांगल्या वाईट अशा दोन्ही प्रवृत्ती दडल्या आहेत . आपण एखाद्या चांगल्या गोष्टीसाठी मानवाला चांगल मानतो अथवा एखादी गोष्ट  पटली नाही तर त्याला वाईट मानतो, 

असे न करता आपण प्रत्येक माणसाला जसे आहे तसे स्वीकारून फक्त चांगल्या गोष्टी आत्मसात करण्याचा प्रयन्त केला तर आपलेच आयुष्य किती सुखकर होईल नाही का ? 

आपल्याला सत्य परिस्थितीची जाणीव असेल , आहे तस स्वीकारल्यामुळे आपण कोणतीही अपेक्षा करणार नाही आणि केवळ चांगल्या गोष्टी घेतल्याने आपल्या ज्ञानात भर पडेल ! एकदा विचार करून बघा ! 


पाप - पुण्याचा हिशोब - 

आता आपण जर या सर्व गोष्टींचा विचार केला तर आपल्या लक्षात येईल कि इंद्रिये आपली कर्तव्ये करत असतात आपण ज्या पद्धतीने विचार करतो त्या प्रमाणे आपले कर्म असते . एखाद्या चुकीच्या कार्याचा उद्देश चांगला असू शकतो आणि एखाद्या चांगल्या कार्याचा उद्देश चुकीचा असू शकतो तर मग अशा परिस्थितीत त्याचा हिशोब भगवंत ठेवतात हे खरं आहे का ? 

तर त्याच सरळ उत्तर असं आहे कि आपण जी कर्म करतो त्याच प्रमाणे त्याचे फळ आपल्याला मिळत असते. 


यासाठी आपण नेहमीच ज्ञानाच्या मागे असावे जेणे करून ज्ञान आणि बुद्धीच्या संगमातून उत्तम कार्य आपल्याला करता येईल! 

जैशी पूर्वदिशेच्या राउळीं । उदया येतांचि सूर्य दिवाळी ।

कीं येरीही दिशां तियेचि काळीं । काळिमा नाहीं 

अर्थात - जसा सूर्य पूर्वेला उगवून साऱ्या दिशांना उजळवून टाकतो तसेच आपल्या कर्माने आपली कीर्ती सर्वत्र पसरते. 


परंतु पुन्हा माउली म्हणतात हे बुद्धी आणि ज्ञानाच्या तसेच कर्माच्या संयोगातून जे ध्येय प्राप्त होईल ते  सरळ ईश्वराला अर्पण करावे त्यात अहंकार आणला कि नुकसान निश्चित आहे. 


- सांख्ययोग आणि कर्मयोग 

आपल्या सगळ्यांना देखील अर्जुनाप्रमाणे नक्कीच प्रश्न पडला असेल कि नेमका कोणता मार्ग निवडावा ? 

सर्व काही विधिलिखित आहे असे समजून सांख्ययोगाचा कि ज्ञान आणि आपले कर्म करून कर्मयोगावाचा ? 


सर्व विधिलिखित असल्याचे माहित असताना आपण ज्ञान आणि कर्म करून आपले ध्येय साधतो आणि ध्येय साध्य झाल्यावर कोणत्याही फळाची अपेक्षा न करता ईश्वराला अर्पण करतो कारण त्याच्याच योजनेनुसार सर्व काही घडलेले असते . मग या दोन्हींमधील खरे काय ? श्रेष्ठ काय ? 


याचे उत्तर देताना भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला तथापि आपल्या सर्वांना उपदेश करतात कि दोन्ही मध्ये श्रेष्ठ आणि कनिष्ठ असे काहीच नाही , 

दोन नद्यांचा उगम आणि प्रवाह वेगवेगळ्या ठिकाणी असला तरीही शेवटी सागराला मिळणे हे लक्ष असते. त्याच प्रमाणे आपण आपल्या आयुष्यात एखाद्या लहान पणतीचा उपयोग केला किंवा एखाद्या मोठ्या विजेच्या हॅलोजन चा उपयोग केला तरीही दोन्हीचा शेवटी उद्देश अंधार दूर करणे असतो. 


त्यामुळे या दोन्ही योगाच्या वेळोवेळीच्या भिन्न वापरातून शेवटी आपली ध्येयपूर्ती आणि आपल्या आयुष्याचा उद्धार हाच त्या मागचा उद्देश आहे त्यामुळे आपण या विविध योग किंवा ज्ञानाचा उपयोग कसा योग्य ठिकाणी करतो हे महत्वाचे आहे. 




या सर्व महान ज्ञानाचे आचरण करताना , आपले कर्म करताना, ज्ञान प्राप्त करताना संयम अतिशय महत्वाचा असतो .

आपल्या इंद्रियांवर ताबा मिळविणे आवश्यक असते. 

वारंवार हि सर्व चर्चा ऐकून अर्जुन विचारतात कि हे कसे साधायचे ? 

योगस्थ कसे व्हावे ? संयम कसा ठेवावा ? इंद्रियांवर ताबा नक्की कसा मिळेल ? 


योग म्हणजे नक्की काय ? तो कसा आणि का करावा ? त्याने वरील गोष्टी साध्य होतील का ? 

मला पुन्हा स्पष्ट कराल का ? 



"ऐसें जें जें कांहीं । उक्त असे इये ठाईं ।

तें आघवेंचि पाहीं । सांगेन आतां ॥

तूं चित्त देऊनि अवधारीं । ऐसें म्हणौनि श्रीहरी ।

बोलिजेल ते पुढारी । कथा आहे ॥"

अर्थात - जे जे काही या बाबतीत शास्त्रात सांगितलेले असेल ते सर्वच मी तुला आता सांगेन, पहा.तू मन लाऊन ऐक. 

असे म्हणून श्रीहरी जे बोलले ती कथा पुढे आहे, ती सांगण्यात येईल असे माउली म्हणतात. 


येथेच अध्याय पाचवा कर्मसंन्यास योगाची सांगता होते आणि सहाव्या अध्याय आत्मसंयम योगात भगवंत अर्जुनाला योग साधनेचा उपदेश करतात... 


 
 
 

Comments

Rated 0 out of 5 stars.
No ratings yet

Add a rating
bottom of page