top of page
Logo - DWA (1).png
Logo - DWA (1).png

अध्याय पंधरावा - पुरुषोत्तमयोग

  • Apr 20
  • 4 min read

आपल्या स्वतःच्या अंगातील गुणांची नव्याने ओळख झाल्यानंतर स्वतःबद्दल , जन्म मृत्यूबद्दल आणखी ज्ञानाची ओढ अर्जुनाला लागली. आपण सर्वोत्तम कसे व्हावे ? पुरुषोत्तम म्हणजे काय अशा अनेक शंका अर्जुनाने विचारल्या ... 

त्यावर अर्थातच भगवंताने निरसन करण्यास सुरुवात केली. 


अर्जुनाच्या पुण्याईमुळे, भगवंतावरील अपार श्रद्धा आणि प्रेमामुळे तसेच माउलींच्या दिव्य अक्षरांमुळे हे ज्ञान आपल्या पर्यंत पोचत आहे. 


तर मग चला अतिशय संयमाने, विनम्रपणे आणि अहंकार बाजूला सारून सर्वोत्तम ज्ञानाचे आणखी काही कण वेचण्याचा प्रयत्न करू 

आणि सुरु करू अध्याय पंधरावा पुरुषोत्तमयोग... 


१. विश्वाचा महावृक्ष 

एका बीजातून विश्वाच्या महावृक्षाची निर्मिती झाली पुढे पंचमहाभूतांमुळे जीव निर्माण झाले. हेच जीव ६४ लक्ष योनींमध्ये विभागले गेले. पुढे त्यातून स्त्री, पुरुष आणि नपुंसक निर्माण झाले. 


या महाकाय वृक्षाला माउली संसारवृक्ष असे नाव देतात, 

पुढे माउली म्हणतात कि जसा सूर्य किती उंचीवर आहे हे आपल्याला ठाऊक नाही तसेच या संसारवृक्षाचा पसारा आपल्याला माहित नाही. 

हा संसारवृक्ष अतिशय महाकाय आहे त्यामुळे तो आपल्याला अविनाशी वाटतो. 


ज्या प्रकारे समुद्राच्या पाण्याची वाफ झाली म्हणून समुद्र आटत नाही , वाफेचे ढग होतात आणि त्यातील पाण्याने नद्या भरून जातात आणि पुन्हा या नद्या समुद्राला येऊन मिळतात. 

सूर्यास्तानंतर सूर्योदय होतो , कलयुग संपले कि पुन्हा सत्ययुग सुरु होते अर्थात हे चक्र सुरूच राहते. अशाच गोष्टींप्रमाणे भासतो म्हणून संसार वृक्ष देखील अविनाशी भासतो. 

परंतु हे सर्व क्षणभंगुर आहे हे ज्ञानी व्यक्तीलाच कळू शकत ! 

कारण जन्म आहे तिथे मृत्यू आहे क्षणार्धात अंत होऊ शकतो आणि हे तत्वज्ञान ज्ञानीच समजू शकतात. 


मग यालाच जोडून प्रश्न उद्भवतात त्याचे उत्तर शोधू ! 


२. शरीर संपल्यावर आत्म्याचे काय होते ? 


देहाचा लोप होतो परंतु आत्मा संपत नाही ! ज्या प्रकारे तलावाच्या पाण्यात सूर्याचे प्रतिबिंब दिसते आणि पाणी आटले कि प्रतिबिंब नाहीसे होते म्हणून सूर्य नाहीसा होत नाही , पुन्हा पाणी भरले कि पुन्हा प्रतिबिंब दिसू लागते. अर्थात प्रतिबिंब बदलते परंतु सूर्य नाही ! 

म्हणजेच शरीर बदलले तरी आत्मा चिरंतन आहे. 


हाच परमात्मा अविरत भगवंताचा शोध घेत असतो. अर्थात ज्ञानाच्या शोधात असतो. 


३. आत्मज्ञान म्हणजे काय ? 

ज्या प्रमाणे नद्या समुद्राला येऊन मिळतात त्याच प्रमाणे ज्ञानी माणसे भगवंताला येऊन मिळतात ! 


हे जेवढं बोलायला सोप तेवढंच आचरणात आणायला कठीण आहे. 

आता हे कस साध्य करायचं ? 


- आत्म्याच्या साक्षीने जगावे म्हणजेच जसे चंद्राचे प्रतिबिंब विश्वात अनेक ठिकाणी पडते परंतु तो चंद्र एकच आहे त्याच प्रमाणे प्रत्येक देहात भगवंत आहे आणि तो परमात्मा एकाच आहे याची जाणीव असणे. 


- मन स्थिर ठेवणे अर्थात पुन्हा स्थितप्रज्ञ होणे. 


- अहंकाराचा त्याग करणे 


- मोह नष्ट करणे. 


- राजहंस जसा दूध आणि पाणी वेगळे करतो त्याच प्रकारे योग्य गोष्टींची निवड करणे. 


हे सर्व काही सोपे नाही परंतु आपण सगळ्यांनी एक प्रयत्न करून बघायला काय हरकत आहे ? आपण नुसते या मार्गावर चालण्याचे ठरविले तरी भगवंत आपली साथ देईल! 

सूर्योदयानंतर जसा अंधार पूर्ण नष्ट होतो त्याच प्रमाणे ज्ञानाचा प्रकाश पडल्यावर आपल्या आयुष्यातील अंधार पूर्ण नष्ट होईल आणि आपण योगस्थ होऊ शकू ! 

अर्थात ईश्वराच्या आणखी जवळ जाऊ . 


आपण हा सकारात्मकतेचा प्रवास किमान सुरु तरी करुच शकतो ना ? 


भगवंत आपल्याला अविरत दान करत असतो तर आपण किंमत कृतज्ञ तरी होऊच शकतो कि ! 

एकदा विचार करा ! 


४. भगवंत काय देतो ? 


भगवंत हा अविरत दोन्ही हातांनी आपल्याला देतच असतो हे आपल्यावर आहे कि आपण त्यातील किती घेऊ शकतो ! किती समजू शकतो आणि किती आचरणात आणू  शकतो ! 


या अनेक गोष्टिमंधील आपल्या आयुष्याच्या सर्वात जवळच्या परंतु आपल्याला त्याचे महत्व आयत्या मिळाल्या म्हणून समजत नाही त्या मांडण्याचा प्रयत्न करतो ! 

विचार करा या ज्या गोष्टी भगवंताने केल्या नसत्या तर ? छे कल्पनाच करवत नाही ! 


- भगवंत संपूर्ण सृष्टी तोलून धरतो गेल्या अगणित वर्षांपासून... अनादिकालापासून .... 


- चंद्ररूपाने रात्रीच्या अंधारात प्रकाश आणि शीतलता देतो... 


- सूर्य किरणांनी धान्याचे पोषण करतो. 


- माणसे जेव्हा याच धान्याचे अन्नाच्या स्वरूपात ग्रहण करतात तेव्हा जठराग्नी अर्थात जठर अर्थात पचनसंथा होऊन त्या अन्नाचे पचन करतो 


- याचाच अर्थ ईश्वर सगळं काही करतो तो सर्वत्र आहे... 


मग भगवंत सर्वांमध्ये असून काही लोक सुखी आणि काही दुखी का असतात ? 

हेच पटवून देण्यासाठी माउलींनी अतिशय समर्पक उदाहरण दिले आहे ते म्हणजे, 

सप्तस्वर जरी तेच असले तरी गायक भिन्न असतात त्यामुळे त्यातून निर्माण होणारा नाद हा वेगळाच असतो त्याच प्रमाणे परब्रह्म एकच असले तरी जाणीवा वेगळ्या असतात ! 

तमोगुण , रजोगुण आणि सत्वगुण या तिन्हींचा प्रभाग वेगवेगळा असतो त्यामुळे काही सुखी तर काही दुःखी असतात. 


मग यात उत्तम कोण ? पुरुषोत्तम म्हणजे कोण ? 


५. पुरुषोत्तम कोण असतो ? 


यात पुरुष या शब्दाचा स्त्री-पुरुष असा अर्थ नाही मुळात भगवंत हा भेद मनातच नाहीत ! 


तर पुरुष म्हणजे स्थिती किंवा तत्व ! 


या संसारवृक्षात ३ प्रकारचे पुरुष असतात. 


- क्षरपुरुष म्हणजेच भूतमात्र अर्थात देह ज्यांना अंत आहे असे . सगळ माझ आहे अशी मान्यता असते परंतु एक दिवस सर्व सोडून द्यावं लागत ! 


- अक्षरपुरुष म्हणजे चैतन्य जे संपत नाही. 


आणि क्षर आणि अक्षर या पलीकडे जाऊन जे चिरंतन आहे जे सर्वोत्तम आहे कधीच न संपणारे आहे. 

सूर्याचे प्रतिबिंब आणि मृगजळापेक्षा सूर्य वेगळा आहे त्याच प्रमाणे या दोहोंपेक्षा पुरुषोत्तम वेगळा आहे. 


तो निर्गुण निराकार आहे , अव्यक्त आहे अर्थात भगवंत म्हणजेच पुरुषोत्तम ! 

आणि पुरुषोत्तम अवस्था साधण्यासाठीचा मार्ग म्हणजेच ईश्वराशी एकरूप होण्याचा प्रयत्न करणे होय. 


आता या ज्ञान ग्रहणानंतर अर्जुनाला दैव आणि ईश्वराविषयी आणखी ज्ञान हवं होत आणखी जाणून घ्यायची इच्छा होती. 

दैवासोबतच चांगल्या वाईट प्रवृत्तीचं महान ज्ञान जे अर्जुनाला अखेर त्याच्या शंकांची उत्तरे देणार होत ! असं ज्ञान भगवंताने देण्यास सुरुवात केली आणि इथेच पुरुषोत्तम योगाची सांगता झाली आणि अध्याय सोळावा दैवासुरसंपाद्विभागयोग प्रारंभ झाला...  


 
 
 

Comments

Rated 0 out of 5 stars.
No ratings yet

Add a rating
bottom of page