अध्याय तेरावा - प्रकृतीपुरुषविवेकयोग
- Alap Phadke
- 2 hours ago
- 4 min read
आपल्या लाडक्या भगवंताबद्दल आणि त्याच्या भक्तीबद्दल आपण मागील अध्यायात जाणून घेतले आणि या भगवंताची सावली असणारी हि सृष्टी अर्थात प्रकृती !
मनुष्याने या प्रकृतीशी एकरूप कसं व्हावं ? आपल्या जीवावर आणि देहावर कोणाचा अधिकार आहे ?
अशा अनेक प्रश्नांची उत्तरे श्रीकृष्णाने अर्जुनाला आणि त्या नंतर माउलींनी आपल्या सर्वांना सोपी करून सांगितली.
हा अध्याय म्हणजे आपल्या शरीराची, वागणुकीची तसेच आपल्या मनस्थितीची शिकवण देणारा महासागर आहे. लहानांपासून थोरामोठ्यांनी समजून घ्यावा असा हा योग आहे.
सर्वांनी संयम राखून विनम्रतेने या महासागरातील काही थेंब आपल्या ओंजळीत धरण्याचा प्रयत्न करू आणि या महासागराची अनुभूती घेऊ,
चला तर मग सुरु करूयात अध्याय तेरावा " प्रकृतिपुरुषविवेकयोग"
१. देह तयार होणारी तत्वे...
देह तयार होण्याची प्रक्रिया या ग्रंथराजात विस्तृतपणे सांगितली आहे तरीही ग्रंथराज ज्ञानेश्वरी आणि त्याच्या इतर अभ्यासकांच्या विवेचनातून संदर्भ घेऊन शक्य तितक्या सोप्या पद्धतीने मांडण्याचा प्रयन्त करतो आहे.
आधीच स्पष्ट केल्या प्रमाणे हे महान तत्वज्ञान उलगडून कोणाला समजावण्याची कुवत माझ्यात नाही त्यामुळे मला जे उमगले ते मांडण्याचा प्रयत्न करतो आहे.
ज्या प्रकारे हत्ती, घोडे, पायदळ, शस्त्रे यांनी एक सैन्य तयार होते त्याच प्रमाणे अनेक विविध तत्वांनी मिळून हा देह तयार होतो.
सर्वांत परमात्मा किंवा मूळ तत्व सामान असले तरी हि तत्वे एकत्रित होऊन देहाची महती ठरते ! याच देहाला क्षेत्र असे संबोधले आहे.
तर हि तत्वे कोणती ते पाहू
- पृथ्वी, जल, तेज, वायू आणि आकाश हि पंचमहाभूते सर्वात महत्वाची तत्वे आहेत.
- यातून निर्माण झालेली बुद्धी आणि मन हि तत्वे.
- अहंकार , ज्या प्रमाणे अमावास्येला चंद्र दिसत नाही परंतु तो असतो त्याच प्रमाणे शरीरातील अहंकार दिसत नाही परंतु तो जीवनभर या देहाला नाचवतो.
- सुख दुःख
- इच्छा , मन धावत सुटत आणि बुद्धी वाट्टेल तशी वागते तेव्हा जे निर्माण होते ते तत्व म्हणजे इच्छा !
- द्वेष, इच्छा पूर्ण झाली नाही कि अर्थातच द्वेष निर्माण होतो.
- कान, डोळे, त्वचा, नाक आणि जीभ याच तत्वांना आपण ज्ञानेंद्रिये असे म्हणतो ज्यावर ताबा ठेवणे अतिशय आवश्यक आहे.
याच ज्ञानेंद्रियातून पुढे त्यांचे विषय तत्वाच्या रूपात निर्माण होतात ती म्हणजे
स्पर्श , शब्द, रस, रूप आणि गंध होय !
- वाणी, हात, पाय आणि दोन अधोद्वार यांना आपण कर्मेंद्रिये असे म्हणतो ज्यातून पुढे त्यांचे विषय तत्व म्हणून उदयाला येतात,
उच्चारण , चालणे, स्वीकार, त्याग, मलोत्सर्जन
- अव्यक्त प्रकृती, चेतना हि दोन महत्वाची तत्वे येतात.
- धृती , आपली सर्व इंद्रिये एकमेकांशी भांडतात परंतु एकाच देहात नांदतात हे ज्या धैर्यामुळे शक्य होते त्यालाच धृती तत्व असं म्हणतात !
- आणि शेवटचे सर्वात महत्वाचे तत्व म्हणजे जीव होय !
हि सारी तत्वे जेव्हा एकत्र येतात तेव्हा देह तयार होतो आणि त्यातील विचारांनुसार ते ज्ञानी किंवा अज्ञानी ते ठरतात !
मग ते कसे ओळखायचे ते पाहू !
२. अज्ञानी माणसाची लक्षणे
ज्ञान प्राप्त करून परमेश्वराशी एकरूप होण्यासाठी वेळ हा लागतोच त्यासाठी आपल्याला अनेक गोष्टी कराव्या लागतात परंतु तोपर्यंत किमान पण काय करू नये म्हणजे आपण अज्ञानी ठरू आणि आपल्याला देखील अज्ञानी लोकांप्रमाणे त्याचे दुष्परिणाम भोगावे लागतील हे पाहू !
भगवंताने अज्ञानी माणसाची अनेक लक्षणे स्पष्ट केली आहेत परंतु आजच्या काळाला अनुरूप आणि आपल्या तरुण पिढीला समजतील अशी निवडक आपल्यासमोर मांडतो आहे.
अज्ञानी मनुष्य कसा असतो !
- अतिशय संशयी असतो
- चुकीच्या मार्गाने अर्थात वाम मार्गाने पैसे कामविण्यास तयार असतो
- वैर धरून ठेवणारा असतो.
- थोड्याश्या स्तुतीने हुरळून जाणारा अर्थात हलक्या कानाचा असतो.
- गुरूकडून ज्ञान संपादन करतो आणि गुरूंशीच उद्धट वागतो , त्यांचा अनादर करतो.
- अजिबात संयम नसतो, त्याचे मन अति चंचल असते.
- कोणाचे चांगले बघवत नाही असा मत्सरी असतो.
- मनातून कपटी असतो.
- स्वतःचे सारखे कौतुक करत असतो.
- स्वार्थी असतो. ( ज्या गोष्टीला अनेकदा आपण सर्वजण प्रॅक्टिकल वागण्याच्या नावाखाली साधत असतो)
- कृतघ्न असतो.
- आहार आणि निद्रा यापुढे कोणतीच गोष्ट समजत नाही असा मूर्ख असतो.
- कोणी कितीही चांगलं सांगितलं तरी त्याचा अहंकार वाढतच जातो असा गर्विष्ठ असतो.
३. ज्ञानी माणसाची लक्षणे -
ज्ञानी कसा असतो याचे देखील अनेक दाखले भगवंताने दिले आहेत अनेक लक्षणे देखील सांगितली आहेत परंतु जेवढे शक्य त्या सोप्या भाषेत आणि आजच्या काळासाठी योग्य अशी निवडक मांडण्याचा प्रयत्न करतो आहे.
ज्ञानी मनुष्य होण्यासाठी अर्थात आपण आयुष्यात कसे असावे याची काही लक्षणे !
ज्ञानी माणूस कसा असतो,
- उगीच स्पर्धा करत नाही.
- विनाकारण बोलत नाही अर्थात विचारल्याशिवाय सल्ला देत नाही.
- केलेले उपकार बोलून दाखवीत नाही.
- कोणत्याही मन आणि सन्मानाचा त्याला भार वाटतो.
- गुरूंविषयी कृतज्ञ असतो.
- लांघूळचलन करत नाही अर्थात स्वार्थासाठी कधीच कोणाची प्रशंसा करत नाही.
- चातुर्य लपवितो केवळ योग्य वेळीच त्याची प्रचिती लोकांना देतो.
- शब्द जपून वापरतो.
- योग्य सांगत निवडतो.
- सर्वांना हवा हवासा वाटतो.
- केलेलं पुण्य कधीच बोलून दाखवत नाही.
- स्थितप्रज्ञ असतो.
- त्याला पाहिलं तर असं भासत कि याला काहीच माहित नाही परंतु ढग जसे हवेवर तरंगणारे पोकळ भासतात परंतु तेच पाऊस पडतात तसाच ज्ञानी माणूस असतो.
या सर्व लक्षणांचा नीट विचार केला तर हि सगळी भक्ताची लक्षणे भासतात ना ?
अर्थात जो ज्ञानी तो भक्त आणि जो भक्त तोच ज्ञानी असतो !
आणि अशा व्यक्तींसोबत ईश्वर नेहमीच उभा असतो.
४. ज्ञेय म्हणजे काय ?
परब्रह्माने सर्वकाही व्यापून टाकले आहे हे आपण जाणतोच तरीही हे परमतत्व अतिशय सूक्ष्म स्वरूपात चराचरात वसलेलं आहे जेणे करून त्याबद्दल आपण सहज रित्या समजू शकतो.
जसे लहान बालकाला एकाच घासाचे तुकडे करून देतात जेणे करून त्याला ग्रहण करण्यास सोपे होते तसेच भगवंताने हे प्रकृतीचे हे ज्ञान आपल्याला या चार विभागांमध्ये वाटून आपल्यासमोर ठेवले. अर्थात या अध्यायातील हे ४ भाग
क्षेत्र म्हणजेच देह
अज्ञान
ज्ञान
ज्ञेय
आता हि प्रकृती आणि यातील आपला देह तसेच पुरुष अर्थात त्यातील आत्मा यांचा परस्पर संबंध कसा आहे ते शोधण्याचा प्रयत्न करू !
असे अनेक संदर्भाचे दाखले देण्यात आले आहेत परंतु अगदी सोप्या आणि सरळ भाषेत मांडण्याचा प्रयत्न केला आहे.
- प्रकृती म्हणजे देह आणि पुरुष म्हणजे आत्मा
- प्रकृती कर्म करून घेते आणि पुरुष कर्म चांगले कि वाईट यानुसार सुख- दुःख भोगतो
- प्रकृती अर्थात देह प्रकट होतो किंवा नष्ट होतो परंतु पुरुष अर्थात आत्मा हा चिरंतन असतो !
- प्रकृती अर्थात देह हा सगुण आहे कारण तो दिसतो तर पुरुष अर्थात आत्मा हा निर्गुण आहे कारण दिसत नाही परंतु देहात वावरत असतो.
- प्रकृती अर्थात देह इच्छा किंवा कर्म यांना जन्म देते तर पुरुष हा सर्वांना प्रकाशमान करतो !
या सर्वच सारासार विचार केला असता आपण उत्तम कर्म करत राहिलो, ज्ञान मिळविले कि आपण प्रकृतीशी अर्थात भगवंताशी एकरूप होण्यास सुरुवात करतो.
त्यामुळे आपण सर्वांनी संयम ठेऊन, विवेक बुद्धीने उत्तम कार्य करावे, ज्ञान ग्रहण करावे आणि त्याचे फळ भगवंताला अर्पण करावे म्हणजे आपल्याला अहंकाराची बाधा होणार नाही !
म्हणजेच आपण प्रकृतीशी म्हणजेच भगवंताशी एकरूप होऊ आणि मग आपल्याला स्वर्गलोक मृत्युलोक सर्व सामान वाटेल आणि कुठेही असलो तरी परम आनंद उपभोगू शकू !
या सोबतच आपल्या सर्वांच्या प्रत्येक मानवाच्या अंगी असलेल्या ३ गुणांबद्दल उपदेश करायला भगवंताने सुरुवात केली आणि आपल्या बुद्धीची दारे आणखी उघडणाऱ्या या प्रकृतिपुरुषविवेकयोग अध्यायाची सांगता झाली आणि अध्याय चौदावा "गुणतीतयाने" प्रारंभ झाला !



Comments