top of page

अध्याय तिसरा - कर्मयोग

  • Aug 1
  • 7 min read

आपण सर्वांना माहीतच आहे कि सांख्ययोग समजल्यानंतर "आत्मा हा चिरंतन आहे. सर्वकाही विधिलिखित आहे. आपण काही करत नाही." अशा गोष्टी समजल्या नंतर मग युद्ध तरी का करावे ? जर सर्व विधिलिखित आहे तर हा संघर्ष आणि आपली ध्येयपूर्ती यामागे आपण कष्ट का घ्यावेत ? त्यातून काय साध्य होणार ? आणि आपली कर्म का करत राहावे ? असे अनेक प्रश्न अर्जुनाला पडले. 


अर्थात आपण जे काही करत असतो ते जर पूर्वनियोजित आहे , आपण कर्म करत असताना फळाची अपेक्षा ठेऊ नये असं सगळं असताना आपण वीणाकारण धावपळ का करावी ? 

आपण सकाळी आपल्या कामाच्या ठिकाणी जाऊन आपल्या ध्येयाच्या आणि संध्याकाळी घरी येऊन घेत असलेल्या परिवाराच्या जबाबदारीला काय अर्थ? 

मित्रमैत्रिणींपासून ते आपण ज्यांवर प्रेम करतो त्या सगळ्यांसाठी आपण अहोरात्र झटत असतो ते का ? 

असे प्रश्न आपल्या सगळ्यांना पडणे अतिशय स्वाभाविक आहे आणि आपण आपल्या सगळ्या प्रश्नांची उत्तरे शोधण्यासाठीच हे ग्रंथ वाचत नाही का ? हीच उत्तरे आपल्याला भगवंताने सांगितली नाहीत का ? 

जशा प्रचंड नदीच्या प्रवाहातून पक्षी आपली तहान भागवतात तसेच आपण पूर्ण लक्ष देऊन सारासार विचार करून यातून ज्ञान वेचायला हवे. 


आपल्या कर्माचे काय महत्व हेच पटवून देण्यासाठी भगवंताने अर्जुनाला, आपण सर्वांना तथापि संपूर्ण विश्वाला " कर्मयोग " सांगण्यास सुरुवात केली. 


कर्म का करावयाचे ? 

आपल्या सर्वांना पडलेला महत्वाचा प्रश्न आहे. 

ब्रह्मदेवाने जेव्हा सृष्टी निर्माण केली तेव्हा त्यांनी संदेश दिला कि व्रत वैकल्ये, पूजा अर्चा हे एकवेळ केले नाही तरीही चालेल परंतु सुखाच्या प्राप्तीसाठी कर्म करणे अतिशय आवश्यक आहे. 

अर्थात जेव्हा आपल्याला फळाची अपेक्षा असते तेव्हा आपल्याला स्वतः झाडावर चढावे लागते, मग योग्य त्या फांदीची निवड करावी लागते आणि मग त्या फांदीवर पोचल्यावर आपल्याला फळ मिळते तसेच कर्म करून योग्य कर्म निवडून प्रयत्न केल्याशिवाय कोणतीही गोष्ट आपल्याला मिळत नाही म्हणून आपण कर्म करावे. 


योग्य कर्माची निवड ! 

आता कर्म करत असताना आपण सर्वांनाच अनुभव असेल कि आपल्या सभोवताली अनेक वाईट प्रवृत्तीची माणसे असतात जी आपल्याला अयोग्य कर्म करण्यासाठी प्रवृत्त करतात. चुकीच्या मार्गाने जाण्याचा आग्रह धरतात अशा वेळी आपण खरंच या सर्वांपासून वेगळे राहून योग्य करतो आहोत का असा प्रश्न आपल्याला पडतो. 


 आजकालच्या काळात प्रत्येक गोष्ट सोशल मीडिया वर असावी, अति मद्यप्राशन, आणखी लालसा असणाऱ्या गोष्टी तसेच अयोग्य किंवा अधर्मी कार्य करून लवकरात लवकर पैसे कमविणे अशा अनेक गोष्टी तरुण पिढीला घट्ट धरून आहेत. केवळ इच्छा नसताना आजूबाजूच्या दबावामुळे आपण या गोष्टी करण्यास प्रवृत्त झालो तर आपली अधोगती निश्चित आहे. याच गोष्टीला आपण Peer Pressure या नावाने संबोधतो ! 

आपण या कोणत्याही गोष्टींच्या आहारी Pressure मुळे न जात जर आपली तत्वे टिकून ठेवली तर सभोवतालचा कोणताही परिणाम आपल्यावर होणार नाही आणि आपली कीर्ती सर्वत्र पसरेल आपले आयुष्य सार्थक ठरेल. 

याचे उत्तम उदाहरण माउलींनी सांगितले आहे ते म्हणजे 


तो कामनामात्रें न घेपे । मोहमळें न लिंपें ।जैसें जळीं जळें न शिंपे । पद्मपत्र ॥ 

अर्थात - ज्या प्रमाणे कमळ पाण्यात तरंगते परंतु त्याला पाण्याचा थेंबाचा देखील स्पर्श होत नाही अथवा आजूबाजूच्या चिखलाने मलीन होत नाही त्याच प्रमाणे आपण सभोवतालच्या गोष्टींपेक्षा वेगळे असलो तेव्हाच आपली प्रतिमा टिकून राहते. 


त्यामुळे आपण सर्वांनी याचा नक्की विचार करायला हवा कि किती गोष्टी आपण स्वतःच्या ठरवून करतो आणि किती सभोवतालच्या दबावामुळे करत असतो. 

कर्मयोगी माणसाची लक्षणे - 


आता आपण म्हणाल कि असा कर्मयोगी व्हायचे म्हणजे नक्की काय करायचे ? 

यात भगवंताने कर्मयोगी माणसाची अनेक लक्षणे सांगितली आहेत परंतु मी आजकालच्या काळात संयुक्तिक ठरतील आणि आपल्या दैनंदिन जीवनात उपयोगाला येतील अशी काही ठराविक लक्षणे इथे मांडत आहे. 


जे स्वधर्में निष्कामता । अनुसरले पार्था ।ते कैवल्यपद तत्त्वतां । पातले जगीं ॥

अर्थात - अर्जुना, जे निष्काम बुद्धीने स्वधर्माचे आचरण करतात ते या जगतामध्ये तत्वत: श्रेष्ठ अशा मोक्षाला पोहोचतात. 

म्हणजेच आपल्या कोणत्याही कामात आपण टाळाटाळ करून चालणार नाही आपले कार्य आपण नियमित पणे खंड पडू न देता करत राहणे हे अनिवार्य आहे. 

आपण आजकाल सोशल मीडिया वरील गोष्टींमध्ये याला "Consistency" असे म्हणतो आणि त्या रिल्स बघून रोज असे करण्याचे ठरवितो परंतु ते होत का ? 


दुसरे म्हणजे आत्ता कार्य करत असताना आपण दूरवरच्या दुष्परिणामांचा विचार करत नाही. ध्येयपूर्ती अथवा फलप्राप्ती मध्ये सोपा मार्ग नसतो. अर्थात Shortcut नसतो आपण मेहनत घेऊन हा मार्ग सोपा करायचा असतो. 

जेव्हा एखादा मासा आयत्या मिळालेल्या अन्नाच्या लोभाने वेगात त्या जवळ जातो आणि जाळयात अडकतो परिणामी अति लोभात आपला जीव गमवून बसतो. 

त्याच प्रमाणे आपण देखील अनेकदा Early Success किंवा Easy Money  या मागे जाऊन चुकीची कामे करतो आणि आपणच त्यात अडकत जातो. 


मला याची संपूर्ण कल्पना आहे कि हि गोष्ट आपल्या आयुष्यात प्रत्येकाने पूर्वी ऐकली असेल परंतु मला नेहमीच असा प्रश्न पडत असे कि का आपल्याला जे हवं आहे ते लगेच मिळणार नाही ? प्रत्येक गोष्टीसाठी संघर्ष आणि वेळ का लागतो ? एखादी गोष्ट लगेच मिळाली तर काय झालं ? 

या वर्षानुवर्षे माझ्या मनात असलेल्या या प्रश्नाचे अतिशय समर्पक उत्तर मला या ग्रंथराजाच्या कोंदणात असताना उमगले... 


जें सायासें स्तन्य सेवी । तें पक्वान्नें केवीं जेवी ।म्हणौनि बाळका जैशीं नेदावीं । धनुर्धरा ॥

अर्थात - जे तान्हे बालक मोठ्या कष्टाने आईचे दूध पिते, ते पक्वान्न कसे खाणार ? म्हणून अर्जुना ती पक्वान्ने ज्याप्रमाणे तान्ह्या मुलाला देऊ नयेत ॥ 

म्हणजेच ज्या बालकाला धड स्तनपान देखील करता येत नाहीये त्याला पक्वान्न देऊन काय उपयोग ? 

एकदा विचार करा जर अशा बालकासमोर जर पंच पक्वान्न असलेलं ताट ठेवलं तर ते बाळ काय करेल ? थोडं फार खाली नाहीतर अन्नाची नासधूस करेल. 

परंतु जर एखाद्या मोठ्या समज असलेल्या मुलासमोर जर ताट ठेवले तर तो संपूर्णपणे त्याचा आनंद घेऊ शकेल. 


अर्थात परमेश्वराने आपल्यासाठी केवळ स्तनातील दूध नाही तर पंचपक्वान्न तयार ठेवली आहेत परंतु ती स्वीकारण्यास आपण तयार नाही किंबहुना त्या लहान बालका प्रमाणे दुधापेक्षा पंच पक्वान्न हे अधिक चविष्ट असतात याची आपल्याला कल्पना देखील नाही ! 

परंतु आधी आपण हळू हळू मोठे होतो तस अन्न ग्रहण करायला शिकतो आणि मग आपण संपूर्णपणे  आस्वाद घेऊ शकतो ! 

त्यामुळे सध्या जे आपल्याला मिळत आहे ते स्वीकारून स्वतःला पंच पक्वान्नासाठी योग्य करणे हे आपल्या हातात आहे. 


सध्याच्या भाषेत आपण "Trust His Plan" असं म्हणतोच कि ! 


आज माझ्या आयुष्यातील पूर्वापार प्रश्नाचे उत्तर मला गवसले. आपल्याला देखील गवसले असेल परंतु विचार करा जर हे उत्तर आपल्याला आज पासून १०/२० वर्षांपूर्वी किंवा आपल्या बालपणी समजावले असते तर आपल्याला उमगले असते का ? 

 


असो कर्मयोगी माणसाचे तिसरे लक्षण म्हणजे आपले कर्म आपण करत रहावे. त्याची तुलना कोणाशीही करू नये! 

आपण अनेकदा तुलना करतो किंवा दुसऱ्यांचे अनुकरण करण्यास जातो परंतु आपल्यासाठी ते योग्य आहे का याचा विचार कधीही करत नाही. 

गायीचे दूध आणि साखर हे प्राशन करण्यास अतिशय उत्तम लागते परंतु एखाद्या माणसाच्या पोटात जंत असतील आणि त्याने ते प्रश्न केले तर त्याचे विष होते. 

त्यामुळे आपण आपले कार्य करत राहावे. 

एखाद्या नोकरी करणाऱ्या माणसाने जर व्यावसायिक असल्यासारखे कार्य केले तर त्याची नोकरी जाईल आणि एखाद्या व्यावसायिकाने जर नोकरीत असल्याप्रमाणे वर्तन त्याच्या कार्यालयात केले तर त्याच्याकडील माणसे त्याला हल्ल्यात घेतील आणि परिणामी व्यवसायवृद्धी होणार नाही !

आपण याचा विचार करायाला हवा. 


पुढील कर्मयोगाचे लक्षण म्हणजे उत्तम कर्माने आदर्श घालून देणे. 

आपण जे करतो त्याने आपण जगाला आदर्श घालून द्यायला हवा जेणे करून इतरांना चांगले कर्म करण्याची प्रेरणा मिळेल. 

"एथ वडील जें जें करिती । तया नाम धर्मु ठेविती ।तेंचि येर अनुष्ठिती । सामान्य सकळ ॥ "

अर्थात - या जगात थोर लोक जे कर्म आचरतात, त्यालाच सामान्य लोक धर्म असे म्हणतात, आणि सामान्य प्रतीचे इतर सर्व लोक त्याचेच आचरण करतात. 

आपण देखील जे काम करतो ते उत्तम आणि उत्तमातून सर्वोत्तम करण्याचा प्रयत्न करावा जेणे करून आदर्श निर्माण होईल. 

एवढंच काय तर सर्व विश्व व्यापलेले भगवान श्रीकृष्ण देखील प्रचंड सामर्थ्य असून नित्याने आपले कर्म करतात आणि संपूर्ण जगासमोर कर्मयोगाचा आदर्श ठेवतात. 


कर्मयोगाचे सर्वात महत्वाचे लक्षण म्हणजे " अहंकार होऊ न देणे" 

एखादे कार्य आपण केले आणि ते पूर्णत्वास गेले म्हणून आपण सर्वांना अहंकार चढतो आणि फलप्राप्ती किंवा आपले एखादे ध्येय पूर्ण झाले कि आपण कर्म करणे थांबवितो. 

हे चुकीचे आहे कर्म हे कधीच थांबत नाही , आपली इंद्रिये आपली कर्म करत असतात. झोपेत असताना आपला श्वास सुरूच असतो, पचनक्रिया सुरु असते अर्थात आपण जी काम करतो ती सगळी सुरूच असतात आणि सृष्टी आपल्याकडून करून घेत असते त्यामुळे त्याचा अहंकार होणे घातक आहे असे भगवंत म्हणतात. 

आणि आपल्या कृतीसोबत आपण सद्भावना बाळगली पाहिजे. 




 अहंकारामुळे  होणारे नुकसान - 

आता हे शेवटचे लक्षण पाहून आपण सर्वांना प्रश्न पडेल कि आपण स्वतः हे कार्य केले आहे जरी सृष्टीने करून घेतले तरी आपण हे करण्यासाठी अविरत मेहनत घेतली आहे आणि मग अशा वेळी अहंकार होणे स्वाभाविक नाही का ? 

परंतु आधी सांगितल्या प्रमाणे या सुद्धा अर्जुनाच्या आणि आपल्या शंकेचे निरसन भगवंताने सांगितले आहे. 

ते म्हणजे जर अहंकार बाळगला तर आपले कसे नुकसान होते आणि त्याचाच परिणाम म्हणून आपली वृद्धी थांबते. 

याच अहंकारामुळे आपल्याला मुख्यतः ४ प्रकारे नुकसान होते हे आपल्यासमोर मांडत आहे. 


- अहंकाराने ग्रासलेल्या व्यक्तीला कोणत्याही प्रकारचा सुविचार अर्थात उपदेश रुचत नाही आणि अहंकाराने मदमस्त झालेला व्यक्ती हा तो उपदेश किंवा त्याचे कारण संपवू पाहतो आणि त्यात स्वतःच संपून जातो यासाठी उत्तम उदाहरण म्हणजे "पतंग" नावाचा किडा त्याला प्रकाश सहन होत नाही म्हणून दिव्याची ज्योत विझविण्यासाठी जातो आणि त्या ज्योतिमुळे स्वतः जाळून खाक होतो. आणि याच अहंकारामुळे उपदेशापासून दूर गेल्याने आपल्याला आणखी ज्ञान मिळत नाही. 


- आपण उत्तमपणे आपले कर्म केल्यानांतर आपल्याला फळ प्राप्त होते, समृद्धी प्राप्त होते परंतु त्याचा उपयोग जर केवळ चुकीच्या ठिकाणी आणि उपभोगासाठी केला तर त्या समृद्धीला उतरती कळा लागते. तो पैसा, ते यश कोणतीही गोष्ट आपल्याकडे टिकत नाही आणि परिणामी माणसाची अधोगती होते. 


- आपल्या मनावर अहंकार इतका भारी होतो कि सर्व काही सोपे आणि तुच्छ वाटू लागते. याच गोष्टीतून आपण चुकीची सांगत धरतो ! चुकीचे धाडस करायला जातो ज्याने पाले केवळ नुकसान होते. 

उदा. आपण अहंकारात एखाद्या सापाशी खेळलो तर आपल्याला विषबाधा होते. अशाच प्रकारे आपण अहंकारामुळे चुकीचे निर्णय घेतो आणि आपल्यासाठी हे सर्व घातक असते. 


- सर्वात मोठे नुकसान म्हणजे जस धूळ असल्याने आपल्याला आरसा दिसत नाही त्याच प्रमाणे अहंकार असल्यामुळे आपल्याला सत्य परिस्थिती नवीन ज्ञान याची प्रचिती येत नाही . आपण अपार कष्ट करून जे फळ प्राप्त केले आहे. जे ध्येय साध्य केले आहे ते चिरंतन राहण्यासाठी ज्ञान आवश्यक आहे. 

ज्ञानाविना जीवन व्यर्थ आहे. सत्य परिस्थिती समोर दिसली नाही तर माणसाची अधोगती निश्चित आहे. 


याच सर्व कारणामुळे अहंकार हा कधीच नसावा असा उपदेश भगवंताने केला.  


तर आता या अहंकारावर विजय कसा प्राप्त करावा ? 

याचे प्रत्यक्ष आणि सोपे उत्तर म्हणजे आपल्या स्वतःच्या इंद्रियांवर ताबा ठेवणे होय. सांख्य योगात  आपण इंद्रियांवर ताबा ठेऊन स्थितप्रज्ञ राहण्याबद्दल पहिले. 

कर्म करत असतानाच आपण इंद्रियांवर ताबा ठेवला तर आपण विविध प्रकारचे ज्ञान आत्मसात करू शकतो जे अतिशय आवश्यक आहे. 


कीं तत्त्वनिष्ठु जैसा । नागवे भ्रांतिलेशा ।तो शेषभोगी तैसा । नाकळे दोषा ॥

अर्थात - ज्याप्रमाणे ब्रह्मनिष्ठ पुरुष भ्रांतीला (देहतादात्म्याला) यत्किंचितही वश होत नाहीत त्याप्रमाणे यज्ञातील तो शेष भोगणारा पापाच्या तडाख्यात सापडत नाही. 


या जगात कर्मयोग जे ध्येय प्राप्त करावयाचे आहे आणि जे आपण साध्य केले आहे या दोहोंना टिकवून ठेवण्यासाठी इंद्रियांवर ताबा तर हवाच परंतु या सोबत सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे आपल्याला ज्ञान असणे आवश्यक आहे. 

कर्म केल्याशिवाय ज्ञानाला आणि ज्ञानाशिवाय कर्माला कितपत अर्थ उरतो ? 


आपल्या समोर अनेकदा दोन प्रकारचे लोक येतात एक जे ज्ञान ग्रहण करतात परंतु कृती करत नाहीत आणि दुसरे जे कर्म आणि मेहनत करतात परंतु त्यांना ज्ञानाची आवश्यकता भासत नाही. अशा दोन्ही पराकारचे लोक ध्येयपूर्ती करून विजयी होऊ शकत नाहीत. 

परंतु जो या  दोन्हीचा मेळ साधू शकला तो आपल्या ध्येयापर्यंत नक्की पोचतो. 

पूर्व आणि पश्चिमेला जाणाऱ्या २ भिन्न नद्या शेवटी जाऊन एका विशाल महासागरास मिळतात त्याच प्रमाणे कर्मयोग आणि ज्ञानयोग हे माणसाच्या ध्येयपूर्ती उद्देशासाठी महत्वाचे ठरतात. 


मग आता आपण या ज्ञानाची प्राप्ती कशी करावी ? ज्ञान म्हणजे काय असे अनेक प्रश्न अर्जुनाला पडू लागले ! अर्थात आपण सर्वांचे मन देखील आत्ता पर्यंतच्या अर्थाने ढवळून निघायला सुरुवात झाली असेल ... 


याच वेळी या तिसऱ्या "कर्मयोग" या अध्यायाची सांगता होते आणि पुन्हा एकदा काय आणि कसे यात आपण देखील अर्जुनाप्रमाणे पुन्हा स्तब्ध झालेल्या आपण सर्वांना भगवंत श्री कृष्ण अध्याय चौथा "ज्ञानसन्यासयोग" सांगण्यास सुरुवात करतात ! 


Comments

Rated 0 out of 5 stars.
No ratings yet

Add a rating
bottom of page