अध्याय अठरावा - सर्वगीतार्थसंग्रहयोग
- Apr 2
- 4 min read
पाहता पाहता आपण श्रीमद भगवत गीतेच्या शेवटच्या अध्यायापर्यंत येऊन पोचलो.
विचार करा, जेव्हा आपण अध्याय पहिला अर्जुनविषादयोगाची सुरुवात केली तेव्हा आपल्या मनात किती शंका आणि किती प्रश्न होते !
या नंतर जस जसे आपण ज्ञान, कर्म, संयम, योगधारणा इत्यादी गोष्टींचे महत्व समजत गेलो तस तसे आपले अनेक प्रश्न आणि शंकांचे निरसन होत गेले. तसेच अनेक शंका आपल्या मनात निर्माण देखील झाल्या !
परंतु एवढे गहन आणि महान ज्ञान काही दिवसात उमगणे शक्य आहे का ? त्यासाठी वारंवार आपल्याला या ग्रंथराजाच्या कोंदणात शिरावे लागेल.
अहो आपण आपली गोष्ट काय करत आहोत एकदा भगवान शंकर पार्वती मातेला म्हणाले कि जेवढ्या वेळी मी गीता अनुभवतो त्या प्रत्येक वेळी तू तुझ्याप्रमाणेच मला सुंदर भासू लागते. प्रत्येक वेळी नवीन काहीतरी उमगते!
संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माउली म्हणतात कि भागवत गीता हे एक मंदिर आहे. त्याची निर्मिती करताना जणू एकावर एक सतरा मजले निर्माण झाले ते म्हणजे आधीचे सतरा अध्याय आणि हा अठरावा अध्याय म्हणजे या गीता मंदिराचा कळस आहे.
कळसाचे दर्शन केले म्हणजे भगवंतांचे दर्शन झाले. त्याच प्रमाणे या अध्यायाचे पठण म्हणजे संपूर्ण गीतासार आहे.
तर नेहमीप्रमाणे संयमाने, समाधानाने आणि संपूर्ण समर्पणाने या अठराव्या अध्यायात संपूर्ण गीतेच्या सारातील ज्ञानकण वेचण्याचा प्रयत्न करूया आणि सुरु करूया
गीतेचा अठरावा आणि शेवटचा अध्याय सर्वगीतार्थसंग्रहयोग...
१. गीता मंदिर कस आहे ?
सव्वा लक्ष श्लोकांचे महाभारत श्री व्यास मुनींनी रचले , आपल्या लाडक्या बाप्पाने अर्थात श्री गणेशाने ते कागदावर उतरवले त्यातील युद्धाच्या प्रसंगी श्रीकृष्णाने सातशे श्लोकांच्या गीतेचा उपदेश अर्जुनाला केला.
हे गीता मंदिर कसे निर्माण झाले हे आपण पहिले आता माउलींनी या मंदिरात दर्शन घेण्याचे ३ मार्ग आपल्यासमोर ठेवले आहेत .
- बाहेरून प्रदक्षिणा अर्थात गीतेचे पारायण करणे!
- मंदिराच्या सावलीत बसणे म्हणजे गीतेचे श्रवण करणे !
- थेट गाभाऱ्यात दर्शन घेणे म्हणजे गीतेचा चिंतन करणे !
कोणत्याही मार्गाने या ज्ञानाच्या महासागरातील एक थेंब जरी आपण आत्मसात करू शकलो तरी संपूर्ण जीवन आनंदाने भरून जाईल...
परंतु भगवंताच्या आराधनेसाठी कर्म आणि त्याग महत्वाचे !
२. कर्मत्यागाचे तीन प्रकार
- तामस त्याग म्हणजे इच्छा संपून आळसाने कर्म टाळणे होय.
- राजस त्याग म्हणजे मोठेपणाने प्रारंभ करून नंतर झेपत नसल्याने कर्म अर्ध्यात सोडणे.
- सात्विक त्याग म्हणजे सर्वात उत्तम त्याग याचाच अर्थ कर्म करून मग त्याच्या फळाचा त्याग करणे होय! त्या सोबतच क्रोधाचा, आळसाचा, अहंकाराचा आणि चुकीच्या कर्माचा त्याग करणे होय.
३. वृत्तीचे ३ प्रकार
या सृष्टीमध्ये ब्रह्मदेवांपासून ते कीटकांपर्यंत प्रत्येकामध्ये सर्वश्रुत ३ गुण असतात ते म्हणजे सत्व, रज आणि तमस
अर्थात हे ३ गुण आणि त्यांच्यावरून मनुष्याची वृत्ती ठरते.
भगवंतांनी या देखील वृत्तीची कित्येक लक्षणे सांगितली त्यातील काही मांडण्याचा आपल्यासमोर प्रयत्न करतो आहे.
# तामसी वृत्तीची लक्षणे
-योग्य - अयोग्य समजत नाही.
-विचार संपूर्णपणे दिशाहीन असतात.
- ज्या प्रमाणे पतंग नावाचा कीटक आपल्या पंखांनी ज्योत विझवू पाहतो आणि त्यातच जळून खाक होतो आणि ज्योत अर्थात प्रकाश देखील तसेच तामसी वृत्तीची माणसे स्वतः सोबत दुसऱ्यांना देखील त्रास करतात.
- हि माणसे आळशी असतात आणि त्यांना कर्म त्यागल्यामुळे आपण त्याच्या फळाला देखील गमावू हि भावनाच त्यांच्यात नसते.
- यांचे विचार उकिरड्याप्रमाणे गलिच्छ आणि कपटी असतात.
- नेहमीच अर्थाचा अनर्थ करून नकारात्मकता पसरविण्याचे काम हि मंडळी करतात.
# राजास वृत्तीची लक्षणे
- हि माणसे स्वार्थापोटी जगाशी चांगले वागतात परंतु घरच्यांचा अनादर करतात.
- प्रचंड अहंकाराने ग्रासलेले असतात.
- यशाने दुसऱ्याला कमी लेखण्याचा प्रयत्न करतात.
- इंद्रिय सुखापुढे यांना काहीही दिसत नाही.
# सात्विक वृत्तीची लक्षणे
- प्रचंड सकारात्मकता
- आपली कर्मे संपूर्णपणे स्वीकारतात
- कर्माला कंटाळत नाहीत.
- कर्म करतात परंतु अहंकार अजिबात नसतो.
- आळसाचा त्याग करतात.
आता आपण यांतील कोठे बसतो आणि स्वतःला सात्विक वृत्तीपर्यंत कसे पोचवू शकतो याचा आपण विचार करायला हवा.
४. भगवंत श्रीकृष्ण आणि अर्जुनाच्या संवादाने जगाला काय दिल ?
हे समजावताना अतिशय समर्पक उदाहरण म्हणजे गीता उपदेशात अर्जुन वासरू झाला, भगवंत त्याची माता झाले आणि भगवंताने अर्जुनाला ज्ञानरूपी दूध पाजले परंतु ते एवढं पोषक आहे कि आज देखील संपूर्ण जगाला ज्ञानाने तृप्त करत आहे.
अर्जुन आणि भगवान श्रीकृष्ण एकमेकांसमोर आरशासारखे भासू लागले अर्थात अर्जुन भगवंताशी एकरूप झाले आणि तेव्हा हा संवाद संपला.
इथंपर्यंत पोचणे सोपे नाही यासाठी उत्तम गुरूंची साथ आणि नित्याने आपलं कर्म केल्यावर एकरूप होण्याचा प्रवास सुरु राहतो.
५. पवित्र अशा भावार्थदीपिका अर्थात ग्रंथराज ज्ञानेश्वरीची निर्मिती
भगवान शंकराने शुद्ध , सात्विक आणि शाश्वत असे ज्ञान माता पार्वतीला सांगितले .
मस्येंद्र नाथांनी याचे श्रवण केले ,
पुढे त्यांनी ते चौरंगीनाथ आणि गोरक्षकनाथांना सांगितले,
गोरक्षकनाथांनी हे ज्ञान गहिनीनाथांना सांगितले.
माणसांतील असुरवृत्ती अर्थात कलयुगातील कली वृत्ती बळावत आहे अशा वेळी समाजाला शांत करणे आवश्यक आहे असे गहिनीनाथांनी त्यांचे शिष्य श्री. निवृत्तीनाथ महाराजांना सांगितले ...
या समजाला शांत करण्यासाठी गीतेचा भावार्थ सर्वांपर्यत्त पोचावा असे श्री निवृत्ती नाथांनी त्यांचे शिष्य आणि बंधू संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराजांना सांगितले आणि मग माउलींनी आपल्या अति मधुर परंतु गहन अशा भाषेत ग्रंथराज श्री ज्ञानेश्वरी ची निर्मिती केली .
आकाशात गरुड देखील भ्रमण करतो आणि पाखरू देखील !
पाखरू स्वतःच्या कुवतीप्रमाणे झेप घेत असते...
मला उमगलेल्या ज्ञानेश्वरीचा अर्थ आपल्यापर्यंत पोचविण्याचा प्रयत्न हा माझ्या कुवती प्रमाणे त्याच पाखरासारखा किंवा त्याही पेक्षा सूक्ष्म आहे.
या पाहिल्याच लेखनाच्या प्रयत्नात मी पांडुरंगाच्या आणि ज्ञानेश्वर माउलींच्या आशीर्वादाने मला उमगलेला अर्थ आणि आजच्या काळातील महत्व आपल्यासमोर मांडण्याचा धाडस केले आहे.
यात जे जे चांगलं वाटेल ते सर्वकाही भगवंत आणि माऊलींचे आणि ज्या चुका असतील ज्या उणीवा असतील त्या सगळ्या माझ्या !
मी आपण सर्वांची त्यासाठी माफी मागतो.
माउलींच्या भाषेत पुन्हा सांगावे तर,
तरी न्यून तें पुरतें | अधिक ते सरतें | करूनि घेयावें हें तुमतें | विनवितु असें ||
अर्थात - मी तुम्हाला विनंती करतो, की मी जे बोलतोय, त्यात काही कमी अधिक झालं, तर समजून घ्या आणि मोठ्या मनाने क्षमा करा.
हा माझा पहिला प्रयत्न पांडुरंगाच्या चरणी चंद्रभागेच्या आणि ज्ञानोबारायांच्या चरणी इंद्रायणीला सादर अर्पण...
राम कृष्ण हरी !



Comments