अध्याय अकरावा - विश्वरूपदर्शनयोग
- Alap Phadke
- 3 hours ago
- 3 min read
आपण सर्वांनीच अर्जुनासमवेत विभूती योगामध्ये भगवंताची अनंत रूपे आणि अफाट सामर्थ्याची ओळख करून घेतली. या अफाट सामर्थ्याची चाहूल लागल्यानंतर अर्जुनाला या भगवंतांचे मुळ विश्वरूप पाहण्याची इच्छा झाली !
आणि तशी मागणी देखील अर्जुनाने भगवंताकडे केली.
या नंतर अशी एक गोष्ट घडली कि आपल्या सर्वांच्याच मनात अचानक संभ्रम निर्माण होईल. तर असे काय घडले ?
अर्जुनाच्या पुण्याईमुळे आणि त्याच्या विनंतीमुळे जे प्रचंड रूप अर्जुनाला दिसले त्या अतिशय महत्वाच्या रोचक अशा अध्यायांतून अतिशय संयम राखून शक्य ते ज्ञान मिळविण्याचा आणि हे महान विश्वरूप आपल्या मनात साकारण्याचा प्रयत्न करू ...
सुरु करूया अध्याय अकरावा विश्वरूपदर्शनयोग
१. अर्जुनाला विश्वरूप पाहण्याची इच्छा का झाली ?
ज्या प्रमाणे शेवाळ दूर झाल्या नंतर पाणी स्पष्ट दिसते त्याच प्रमाणे विभूती योगात भगवंताचे सामर्थ्य आणि त्याची अनेक रूपे अर्जुनाला स्पष्ट दिसली.
अर्जुन भगवंताला म्हणाले कि देवा मी इच्छा प्रकट केली आहे परंतु हे रूप पाहण्याची माझी पात्रता आहे का ? तहानलेल्याला संपूर्ण समुद्र देखील पिण्याची इच्छा होते परंतु बालकाची तहान आणि योग्यता त्याच्या आईला ठाऊक असते . त्याच प्रमाणे माझी पात्रता असेल तर मला या विश्वरूपाचे दर्शन आपण द्यावे.
याच अर्जुनाच्या विनंती नंतर अर्जुनाच्या श्रेष्ठत्त्वामुळे , पुण्यामुळे, कर्मामुळे आणि असामान्य योग्यतेमुळे अर्जुनाला तथा विश्वरूप दर्शन मिळाले.
आणि त्याची प्रचिती या गीतेतून आपण सर्वांना आली !
याचे संपूर्ण श्रेय त्या शिषोत्तम अर्जुनाचेच नाही का ?
२. विश्वरूप कस दिसलं ?
तर भगवंताने प्रकट केलेलं विश्वरूप साकारण्याची माझी कुवत नाही परंतु तरीही यात जे कमी अधिक होईल त्याची क्षमा मागून आपल्यासमोर मांडण्याचा प्रयत्न करतो आहे.
भगवंत म्हणाले कि या विश्वरूपात माझी अनेक रूपे आहेत. आणि त्यात अनेक रंग आणि अनेक आकृत्या आहेत.
अर्जुनाला देखील त्याच प्रमाणे दर्शन घेताना अनेक रूपे दिसली त्यातील काही प्रेमळ होती, काही कठोर होती, काही आनंदी होती, तर काही भयानक , विचित्र आणि रौद्र होती तर काही रूपे हि मित्राप्रमाणे होती.
या सोबतच अर्जुनाला हि रूपे अनेक रंगात होती हे दिसले त्यातील महत्वाचे मूळ रंग म्हणजे
तांब्यासारखी तांबडी अर्थात लाल होती
सूर्योदयाप्रमाणे केशरी ,
सोन्यासारखी पिवळी,
पानांसारखी हिरवी,
आकाशासारखी निळी,
चंद्राप्रमाणे शुभ्र पांढरी
तर काही दाटलेल्या मेघांप्रमाणे जांभळी होती..
या सर्वांनंतर ब्रह्माण्ड व्यापणारे विश्वरूप पाहण्यासाठी अर्जुनाला भगवंताने दिव्य दृष्टी प्रदान केली आणि अर्जुनाला त्या महाकाय अशा रूपाचे दर्शन घडले!
आकाशातील सर्व वीजा एकत्र चमकल्या आणि सहस्त्रसूर्य एकत्र आले तरी कमी पडेल एवढे तेज त्या रूपात होते !
अर्जुनाला वृक्षावर जशी अनंत घरे असतात तशी घरे दिसली..
स्वर्गलोक दिसले, ब्रह्मदेवाचे दर्शन झाले, कैलास पर्वत दिसला त्यावरील विराजमान शंकर भगवानाचे दर्शन झाले, पृथ्वी दिसली, पाताळ लोक दिसले, ऋषी दिसले ..
साक्षात श्रीकृष्ण अवतारातील रूप दिसले...
या महाकाय रूपाने संपूर्ण ब्रह्माण्ड व्यापलेले होते...
आणि अचानक असे काही घडले कि आपण सर्वच संभ्रमात जाऊ !
अर्जुनाला या रूपाची भीती वाटू लागली !
एवढा महान योद्धा , श्रीकृष्णाचा प्रिय भक्त , बलशाली अर्जुन ज्याला हे भाग्य मिळाले
परंतु तरीही अर्जुन का घाबरले ?
३.अर्जुन का घाबरले ?
- या विश्वरूपात अनंत मुखे होती काही सौम्य, काही आश्चर्यकारक परंतु काही भयभीत करणारी मुखे अर्जुनाने पहिली.
यात अनंत नेत्र होते काही शांत परंतु काहींमध्ये क्रोधाचा अग्नी होता...
अनंत हात होते आणि ज्यात महाविनाशी शस्त्रे होती ...
- या मुखांत संपूर्ण सृष्टी होती,...
कुरुसक्षेत्र , कौरव , दोन्ही सेनेतील योद्धे अहो एवढंच कशाला तर पितामह भीष्म, गुरु द्रोणाचार्य आणि कर्णासारखे महारथी देखील याच मुखात शिरत होते .
हे पाहून अर्जुनाला भीती वाटली!
ज्ञानेश्वर माउली म्हणतात मुळात आपल्या लोकांवर वार कसा करायचा त्यांच्याशी संघर्ष कसा करायचा याच प्रश्नांमुळे भगवत गीता आरंभ झाली होती आणि आता या रूपात अर्जुनाला याचे उत्तर मिळणार होते कारण अर्जुनाने संयम ठेवला होता.
जसा आपण देखील संयम ठेऊन हे वाचन करतो आहोत आणि आपल्याला देखील आपल्या प्रश्नांची उत्तरे मिळतील
अर्जुन भगवंताला म्हणाले कि देवा मी आपल्याला प्रसन्न केले आणि आपण या आक्राळविक्राळ रूपात त्याच्या मुखात त्रैलोक्य गिळू पाहत आहात असे का ?
मला भीती वाटते आहे !
त्यावर भगवंत म्हणाले कि या सगळ्या योध्यांना प्रचंड अहंकार चढला आहे , त्यांना असे वाटते कि ते प्रत्येक गोष्टीवर विजय मिळवू शकतात आणि या अहंकारामुळेच मी त्यांचा अंत करणार आहे कारण मी काळ आहे...
अहंकाराने मी त्यांना आधीच मारले आहे आता तू निमित्तमात्र हो !
शस्त्र उचल अर्जुना आणि युद्ध कर !
अर्जुनाला हे निश्चित झाले कि सर्वच सूत्रधार हाच भगवंत आहे जन्म मृत्य सगळं काही त्याच्याच हातात आहे आणि त्यामुळे आपण आपली कर्म करत राहणे हे अनिवार्य आहे !
भगवंत पुन्हा म्हणाले कि अर्जुना हे रूप साठवून ठेव ! ज्याचे दर्शन प्रत्यक्ष देवांना आणि ऋषीमुनींना देखील सहज मिळत नाही ते दर्शन मी तुला दिले आहे !
परंतु तरीही अर्जुनाला भीती वाटत होती आणि यानंतर भगवंताला समजले कि अर्जुन काही या रूपाचा ग्राहक नाही म्हणून ते पुन्हा आपल्या कृष्ण अवताराच्या रूपात आले !
आपल्या श्रीकृष्णच्या या रुपाला पावून अर्जुनाने त्यांना संपूर्ण शरण जाऊन भक्ती करण्याचे ठरविले आणि येथेच हा महान विश्वरूपदर्शनयोगाची सांगता झाली !
पुढे भक्तीबद्दल विचारले असता अर्जुनाला भक्तीविषयी उपदेश करण्यास सुरुवात केली हाच तो अध्याय बारावा भक्तियोग ...



Comments