top of page

अध्याय पहिला - अर्जुनविषादयोग

  • Aug 3
  • 5 min read

या महान ग्रंथराजाचे लेखन करताना सर्वात प्रथम श्री ज्ञानेश्वर माउलींनी श्री गणरायाला वंदन केले आहे, चौसष्ठ कलांचा अधिपती असणारे आणि विद्येचा महासागर असणारे श्री गणरायांच्या प्रत्येक अंग अंगाची महती माउलींनी सांगितली आहे. यातच मला आपण नेहमीच कोणत्याही पवित्र कार्याची सुरुवात करतानाच्या "ॐ" अर्थात ओंकार या शब्दाचा अर्थ समाजला. 

 "ॐ" कराची प्रथम मात्रा/अक्षर 'अ' हे श्री गणरायाचे दोन्ही पाय आहेत.  

"ॐ" कराची दुसरी मात्रा/अक्षर 'उ' हे गणरायाचे मोठे उदर अर्थात पोट आहे. 

आणि "ॐ" कराची तिसरी मात्रा/अक्षर 'म' हे गणरायाचे विशाल मस्तक आहे. 

अशा प्रकारे या ॐ काराची निर्मिती झाली आहे . 

आता आपल्या लाडक्या बाप्पाचा महाभारताशी संबंध तर अनेकांना ठाऊक असेलच, कि श्रीव्यास मुनींच्या मुखातून महाभारत बाहेर पडले आणि श्रीगणरायांनी ते प्रत्यक्ष लिहिले. 


त्रेता युगातील सर्वात मोठ्या रण संग्रामाची कथा अर्थात "महाभारत" या ग्रंथाने सर्व काही जणू आपल्यात सामावून घेतले आहे. जे महाभारतात नाही ते संपूर्ण त्रैलोक्यात नाही. 

आणि भागवत गीता म्हणजे तर महाभारतातील सार... 

महाभारत म्हणजे दिव्य कमळ असेल तर भगवतगीता म्हणजे त्यातील पुष्पपराग आहे. 


अशा या महान भगवतगीतेचा सोप्या भाषेत उलगडून सांगितलेला भावार्थ म्हणजेच भावार्थदीपिका अर्थात प्रचलित ज्ञानेश्वरी! 

आणि याची सुरुवात, पहिला अध्याय म्हणजे अर्जुनविषादयोग... 


आपण सर्वजण महाभारताची कथा हि जाणताच , रणांगणात कौरव आणि पांडव आपापल्या महान सेनेसह एकमेकांसमोर सर्वात मोठ्या संघर्षासाठी अर्थात धर्मयुद्धासाठी उभे ठाकले. धर्मस्थापनेसाठी, हक्कासाठी, न्यायासाठी, प्रतिशोध घेण्यासाठी हे युद्ध होणार होते. प्रत्येकाचा युद्धाकडे बघायचा दृष्टिकोन आणि हेतू वेगळा होता. 


युद्धात प्रत्यक्ष भाग घेणाऱ्या रथी-महारथी योध्यांपासून ते विविध नगरात वसलेल्या त्यांच्या परिवारापर्यंत, आपल्या १०० पुत्रांच्या काळजीने घाबरलेल्या महाराज धृतराष्ट्र - गांधारीपासून ते आपल्या अपमानाचा प्रतिशोध घेण्यासाठी वाट पाहत असलेल्या द्रौपदी पर्यंत, आपल्या वचनासाठी बांधील असणाऱ्या भीष्म पितामह, गुरु द्रोण आणि सूर्यापुत्र कर्णा पासून ते आपल्या बहिणीचा प्रतिशोध घेणाऱ्या शकुनी मामा तसेच पित्याच्या हक्कासाठी लढणाऱ्या वीर अभिमन्यू पर्यंत प्रत्येकासाठी ! 

सगळ्या सगळ्यांसाठी हे धर्मयुद्ध अर्थात हा संघर्ष महत्वाचा होता.  


आज देखील विविध उद्देशाने, विविध कर्तव्यांनी किंवा विविध कारणांनी आपण सर्वच जण कोणत्या ना कोणत्या संघर्षात/ युद्धात सहभागी आहोत... 


ज्या पद्धतीने आपण एखाद्या संघर्ष काळात  सर्वतोपरी विचार करतो, समोरच्या संकटाची चाचपणी करतो याच उद्देशाने युद्धाच्या सुरुवातीला अर्जुनाने श्रीकृष्णाला सांगितले कि रथ  दोन्ही सेनांच्या मध्यभागी घेऊन चला.. या युद्धासाठी आलेल्या सर्व वीरांना मला क्षणभर पाहायचे आहे. 


अर्जुन हा अतिशय पराक्रमी , युद्धकौशल्याने निपुण आणि रणधुरंदर असा योद्धा... भगवंतावर श्रद्धा असणारा, आप्तेष्टांवर प्रेम असणारा आणि धर्म आणि न्यायाचे ज्ञान आणि जाणीव असणारा. परंतु तरीही अर्जुनाच्या मनात दुःख दाटून आले , अनेक संभ्रम निर्माण झाले, अनेक भावनांचे काहूर माजले... 

याच विषादाचे (दुःखाचे) वर्णन म्हणजे "अर्जुनविषादयोग"



अर्जुनाने जेव्हा विरुद्ध पक्षामध्ये नजर फिरवली तेव्हा शत्रूच्या जागी त्यांना आपलेच आप्तेष्ट दिसले, लहानपणापासून त्याच्यावर प्रेम करणारे आशीर्वाद देणारे पितामह भीष्म होते, त्याला धनुर्विद्येचे शिक्षण देणारे गुरुदेव द्रोणाचार्य होते, त्याच्याच परिवारातील बंधू कौरव होते, अनेक नातेवाईक होते, त्याच्याच पुत्रांसमान कौरवांचे पुत्र होते. हस्तिनापुरात महारथी, सैनिक सगळे आपलेच तर लोक होते... 


या प्रसंगी अर्जुनाने श्रीकृष्णाला अनेक प्रश्न विचारले, अनेक संभ्रम समोर ठेवले मी मात्र त्यातील केवळ सार समजून आपल्यासमोर मांडत आहे आणि आपल्या देखील आयुष्यात असे अनेक प्रश्न आपल्या समोर अनेकदा येऊन उभे राहतात आणि आपण म्हणतो "हे तर धर्मसंकट !" 


कुरुक्षेत्रात सर्व आपलेच आप्तेष्ट होते, 

मग शत्रू कोण ? युद्ध कोणाशी करायचे ? 

या सर्वांशी युद्ध करणे योग्य आहे का ? 

असा प्रश्न अर्जुनाच्या मनात आला... 


"जैसा भ्रमर भेदी कोडें । भलतैसें काष्ठ कोरडें ।परि कळिकेमाजी सांपडे । कोंवळिये ॥

तेथ उत्तीर्ण होईल प्राणें । परि तें कमळदळ चिरूं नेणें ।तैसें कठिण कोवळेपणें । स्नेह देखा ॥" 


अर्थात जसा भ्रमर (भुंगा) कोरड्या लाकडाला सहज भोक पाडू शकतो परंतु कमळाच्या मोहात अडकल्या नंतर मोहात अडकून पडतो त्यामुळे त्या पाकळीला भेदू शकत नाही त्याच प्रमाणे अर्जुन हा आप्तेष्टांच्या मोहात संपूर्ण पणे अडकला गेला होता त्या मोहातून निघण्यापेक्षा प्राण गमावला तरी काय हरकत असा विचार अर्जुनाच्या मनात आला.  


आपण देखील जेव्हा एखाद्या ध्येयाच्या मागे कार्य करत असतो तेव्हा अनेकांना आपल्याच लोकांशी संघर्ष करावा लागतो. 

त्यांचा उद्देश शुद्ध असो किंवा स्वार्थी, ते बलवान असोत किंवा कमकुवत खरंच या सर्वांशी संघर्ष करणे योग्य आहे का असा विचार आपल्या मनात घर करून बसलेला असतो. 


सर्व गोष्टींची पूर्वकल्पना असताना हा संघर्ष आपण स्वतः निवडलेला असताना अनेक वेळी आपण आपल्या आप्तेष्टांच्या मोहात, आर्थिक जगात , समाजात , परिवारात , सगळ्या प्रकारच्या मोहात आपण अडकून जातो आणि मग बाकी जगासमोर कितीही खंबीर आणि प्रॅक्टिकल असणारे आपण इथे मात्र स्तब्ध होतो. 


काय करावे काय नाही याचे उत्तर मिळत नाही! असे का होते ? याचा आपण विचार केला आहे का ? 


पितामह भीष्मांचे तसेच गुरु द्रोणाचार्यांचे अनंत उपकार आणि माया आपल्यावर असताना त्यांच्याशी युद्ध कसे करायचे ? या प्रश्नाने अर्जुनाचे मानसिक बल कमी होऊ लागले. 

अनेकदा आपण ज्यांच्याशी संघर्ष करणार असतो त्यांचे आपल्यावर अनंत उपकार असतात , त्यांचा विरोधाचा हेतू देखील शुद्ध असतो परंतु आपले कार्य पूर्ण करण्यासाठी आपलयाला त्यांच्याशी संघर्ष करणे अनिवार्य असते. अशा वेळी त्यांच्याशी संघर्षाच्या नुसत्या विचारानेच आपण उदासीन होऊन जातो. त्यांच्या सोबतच्या आठवणी आणि जुने प्रसंग आपल्या मनात येतात. 

एका बाजूला जे योग्य आहे ते करणे कि या  संघर्ष टाळून आपल्या व्यक्तींना पुन्हा जवळ करणे या द्विधा मनस्थितीत आपण अडकतो. त्यात अनेकदा सामाजिक परिस्थिती किंवा इतर गोष्टींमुळे आपल्या मनावरील ताबा सुटतो आणि आपण खरंच जे करतो आहे ते योग्य आहे का असा विचार आपल्या मनात येतो ! 


पुढे अर्जुनाच्या समोर संभ्रम होता कि धर्मस्थापनेसाठी किंवा तात्विक कार्यासाठी शत्रूला कंठस्नान घालणे हे कितीही योग्य असले , आपल्या बांधवांची, गुरूंची आणि आप्तेष्टांची हत्या करून मला पाप लागेल ! आपण जगत असलेल शुद्ध जीवन यापुढे जगता येणार नाही. आणि या सगळ्याचा परिणाम म्हणून ईश्वर देखील आपल्या पासून लांब जाईल. ईश्वराच्या समोर उभे राहण्याची आपली पात्रता उरणार नाही ! मग काय होणार ? हे सर्व खरच योग्य आहे का ? 


आपण देखील जेव्हा एखाद्या कार्यासाठी तयारी करतो, सामाजिक गोष्टी सोडून आडमार्गाने कार्य करतो, तेव्हा आपल्या प्रत्येकाच्या मनात हा विचार येतो, आपले काम पूर्ण होईल, उद्धेश साध्य होईल परंतु त्यासाठी आपण आत्ता जे करायला निघालो आहे ते बरोबर आहे का ?  एखाद्या उद्देशासाठी किंवा ध्येयासाठी आपण पापाचे भागीदार होत आहोत जे आयुष्यभर आपल्या सोबत राहणार आहे. आणि कुणाला समजले अथवा नाही तरी आपल्याला नेहमी याची आठवण होत राहील ! या नंतर  त्या गोष्टीने आपण ध्येय साधले तरी रात्री शांत झोप लागेल का ? ईश्वरासमोर खऱ्या मनाने हात जोडता येतील का ? आपल्या घरच्यांसमोर किंवा गुरुजनांचा नजरेला नजर मिळवून संवाद साधता येईल का ?


असे अनके प्रश्न समोर असतानाच आपल्यासमोर पर्याय उरतो तो म्हणजे या परिस्थितितपासून दूर जाण्याचा, 

संघर्ष सुद्धा नको ! ध्येयपूर्ती सुद्धा नको ! काहीच नको ! 

या पेक्षा सर्व सोडून दूर कुठेतरी निघून जावे किंवा या जगातून दूर जाण्याचा विचार देखील अनेक लोक करतात ! 

तसाच अर्जुनाने देखील विचार केला या महासंहारापेक्षा युद्ध नको ! आपल्या कडून जे होईल तेवढे करून जीवन व्यतीत करावे. आशा अपेक्षा मोह काहीच न करता समोरच्या माणसांना अथवा परिस्थितीला स्वीकारून संघर्ष टाळावा का ?  


आणि हा संघर्ष करून त्याचा परिणाम तरी काय 

ज्या प्रकारे दोन लाकडे एकमेकांवर घासल्यावर अग्नी निर्माण होते आणि ती सर्व लाकडांना जाळून खाक करते त्याच पद्धतीने या संघर्षात माझ्या संपूर्ण कुळाचा नाश होईल मग आमच्या महान हस्तिनापूर राज्याचे काय ? प्रजेचे काय ? स्त्रियांचे काय ? पुढील पिढीचे काय ? 

अशाच प्रकारे आपण देखील संघर्षापूर्वी अनेक मोह, नाती , आपल्या जबाबदाऱ्या , आपल्या भविष्याची चिंता यात अडकून राहिलेलो असतो त्यामुळे वर्तमानाच्या गोष्टी आपण पूर्णतः समजून शकत नाही ! 

पूर्वी झालेल्या आणि या पुढे होऊ पाहणाऱ्या गोष्टींनी आपल्या मनात भय निर्माण होते, संभ्रम निर्माण होतो. 

आपण जे करतो आहे ते इतके महत्वाचे खरंच आहे का कि ज्यासाठी आपण संघर्ष करत आहोत आणि तो देखील आपल्या आप्तेष्टांशी ! आपल्या स्वतःशी ! 


या आणि अशा असंख्य प्रश्न विचारल्यानंतर देखील भगवान श्री कृष्णाने कोणतेही उत्तर दिले नाही ! या प्रत्येक प्रश्नाचे उत्तर भगवंताकडे होते परंतु तरीही भगवंत शांत होते. 

आणि या गोष्टीने अर्जुनाच्या डोळ्यातून अश्रू बाहेर आले ! अखेर तो रथातून खाली उताराला आणि अग्निदेवाची भेट असणारे महान गांडीव धनुष्य त्याने कुरुक्षेत्राच्या भूमिवर ठेवले ! 


महाभारत आणि धर्मयुद्ध का होत आहे ? संघर्ष का होत आहे याची संपूर्ण कल्पना असताना , 

याच दिवसासाठी अनेक योजना तयार केलेल्या असताना ,

संपूर्ण विश्वाला आवाहन देता येईल एवढे रण कौशल्य असताना, 

आणि रथाचे सारथ्य करण्यासाठी स्वतः तिन्ही लोकांचा स्वामी असताना सुद्धा, 

 स्वकीयांच्या मोहात अडकून, परिणामांच्या भीतीने, भविष्याच्या चिंतेने,

जेव्हा मनात या सर्व विचारांचे आणि दुःखाचे काहूर माजले तेव्हा 

या महायोध्याने शस्त्र ठेवले !

 

अतिशय हताश परिस्थिती येते ,

अनेक प्रश्न समोर उभे थकलेले असतात, 

काय करावे समजत नाही, 

एकही प्रश्नाचे उत्तर कुठूनच मिळत नाही, 

आणि मग आपण स्तब्ध होऊन जातो, 

आपली शस्त्रे बाजूला ठेवतो... 


आणि याच परिस्थितीतून आपल्याला बाहेर काढण्यासाठी स्वतः भगवंत आपल्याला मार्ग दाखवतात,


हीच अर्जुनाची आणि या कलयुगात सर्वांची परिस्थिती दर्शविणारा "अर्जुनविषादयोग" हा पहिला अध्याय संपला आणि भगवंताने "अध्याय दुसरा - सांख्य योग" या माध्यमातून अर्जुनाला उपदेश करण्यास सुरुवात केली ! 


Comments

Rated 0 out of 5 stars.
No ratings yet

Add a rating
bottom of page