अध्याय चौथा - ज्ञानसंन्यासयोग
- Jul 31
- 5 min read
कर्मयोगात आपण कर्म आणि त्याचे महत्व याविषयी जाणून घेतले परंतु तरीही आपल्या सर्वांना अनेक प्रश्न पडले असतील.
खरंच फळाची आणि ध्येयपूर्तीच्या अपेक्षा करावी का ? या सर्व गोष्टी एकमेकांविरुद्ध आहेत तर मग नक्की खरे ज्ञान कोणते ?
आपण ते ग्रहण कसे करणार ? आपल्याला अनेक संशय अथवा संभ्रम देखील आहेत.
आपण सगळेच आत्ता अर्जुनाप्रमाणे संशयात आहोत ! संभ्रमात आहोत ! आपण शिकलेल्या गोष्टी , आपल्याला काही प्रमाणात मिळालेली उत्तरे आणि आपल्याला अजून पडलेले प्रश्न या सर्व विविध विचारांचे काहूर आपल्या डोक्यात माजले आहे.
परंतु तरीही सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे आपण एका विश्वासाने आणि भक्तीने या चौथ्या अध्यायापर्यंत येऊन पोचलो आहोत.
आपण या पुढे देखील भगवंतावर असाच विश्वास ठेऊन आणि असाच संयम ठेऊन या उपदेशातून शक्य तेवढं वेचण्याचा प्रयत्न आपण करत राहू !
यातील अनेक प्रश्नांची उत्तरे आपल्या या अध्यायात नक्की मिळतील आणि अनेक शंका देखील निर्माण होतील परंतु आपण संयमाने आणि विश्वासाने उत्तरे शोधत राहू !
तर सुरु करूया चौथ्या अध्यायाला , ज्ञानसंन्यासयोग -
मग देव म्हणे अगा पंडुसुता । हाचि योगु आम्हीं विवस्वता ।
कथिला परी ते वार्ता । बहुतां दिवसांची ॥
अर्थात - श्रीकृष्ण अर्जुनाला सांगतात कि आत्ताच ज्या कर्मयोगाची ओळख आणि उपदेश त्यांनी आपल्या सर्वांना केला तोच कर्मयोग अनादीकाळापूर्वी त्यांनी सूर्याला सांगितला होता. पुढे त्याचे आचरण देखील होऊ लागले परंतु आता लोकांना त्याचा विसर पडला आहे.
यावर अर्जुन श्रीकृष्णाला अतिशय नम्रपणे प्रश्न करतात कि त्यांचा जन्म अनेकांनी पहिला आहे. ते याच काळात जन्मले आहेत परंतु सूर्य तर कितीतरी युगे असाच आहे मग भगवंताने हा कर्मयोग सूर्यदेवाला सांगितला यावर कसा विश्वास ठेवावा ?
त्यावर श्रीकृष्णाने त्यांना अतिशय महत्वाचे ज्ञान सांगितले ते म्हणजे आपला "आपल्या दोहोंचे अनेक जन्म झाले आहेत! आत्ता आपण पाहतो आहे ते शरीर आहे, अर्जुना तुला अजून त्याची ओळख नाही परंतु मला माझे सर्व जन्म आठवत आहेत!" आपण जसे आरशात प्रतिबिंब पाहतो तो आपल्या समोर उभा असलेला माणूस आपल्याला दिसतो परंतु वास्तविकतेत ती आपली केवळ एक प्रतिमा असते त्याच प्रमाणे आपल्या आत्म्याचे शरीर स्वरूप आपण पाहत असतो.
हीच गोष्ट आजच्या काळासाठी अतिशय सोपी आणि प्रॅक्टिकल जर करून पहिली तर आपण एकदा विचार करा कि सकाळी आपण उठता तेव्हा आपण आरशात पाहतो ते आपले स्वरूप आठवा, आपण ऑफिसात कमला जातो तेथील आरशातले आपले स्वरूप आठवा, आपण कोठे फिरायला गेलो तर तेथे आपण आरशात पाहिलेले स्वरूप आठवा !
प्रत्येक रूप तुम्हाला वेगवेगळे भासेल अर्थात आपण एकाच आहोत परंतु आपली रूपे अनेक आहेत. त्याच प्रमाणे माणसाचे जन्म अनेक होतात !
भगवान श्रीकृष्ण पुढे म्हणतात कि त्यांचे देखील अनेक जन्म झाले आहेत. प्रत्येक जन्माच्या वेळी त्यांचे कर्तव्य त्याचा स्वधर्म आणि त्याचे कर्म हे वेगवेगळे होते परंतु उद्देश केवळ एकाच ! तो म्हणजे धर्मसंस्थापना !
अर्थात भगवंत जन्म कधी घेतात, यातच गीतेचा सर्वात जास्त प्रचलित श्लोक आणि त्याचा अर्थ आपल्याला उमगतो ,
यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत ।
अभ्युत्थानमधर्मस्य तदात्मानं सृजाम्यहम् ॥
परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृताम् ।
धर्मसंस्थापनार्थाय सम्भवामि युगे युगे ॥
अर्थात -
जेव्हा जेव्हा धर्माची (चांगुलपणा, नीतिमत्ता) ऱ्हास होतो, तेव्हा हे अर्जुना,
तेव्हा तेव्हा मी स्वतःला प्रकट करतो (अवतार घेतो).
सज्जनांचे (चांगल्या लोकांचे) रक्षण करण्यासाठी आणि दुष्टांचा (वाईट लोकांचा) नाश करण्यासाठी.
धर्माची (नीतिमत्तेची) स्थापना करण्यासाठी, मी प्रत्येक युगात (प्रत्येक काळात) अवतार घेतो.
यासाठीच परमेश्वर अवतार घेतात यालाच माउलींनी अतिशय सुंदर स्वरूपात मांडले आहे ते म्हणजे
मी अविवेकाची काजळी । फेडूनि विवेकदीप उजळीं ।
तैं योगियां पाहे दिवाळी । निरंतर ॥
अर्थात - मी विवेकदीपाला आलेली अविवेकाची काजळी झाडून तो प्रज्वलित करतो. त्यावेळी योग्यांना निरंतर दिवाळी होते.
म्हणजेच नको असणारी गोष्टी (अंधार ) बाजूला सारून परमेश्वर प्रकाश निर्माण करतो आणि त्याच तिमिरातुनी तेजाकडे नेण्यासाठी परमेश्वर अवतरित होतो.
आज देखील आपण विचार केला तर देवाची व्याख्या / संतांची कोणती जो ज्ञान देतो , ज्ञानाचा प्रकाश देतो तो भगवंत तोच संत !
त्यात आपले गुरुजन आले, आपले पालक आले , आपल्या ज्ञानात भर घालणारे आपले सहकारी, वरिष्ठ, मित्र सगळेच नाही का ?
जेथून जेथून मिळेल ते विविध प्रकारचे ज्ञान आपण स्वीकारत राहिलो , विविध माहिती आपण स्वीकारत राहिलो तर आपल्या ध्येयाची वाटचाल अतिशय सोपी होते.
या ज्ञानाचे अथवा माहितीचे महत्व आज देखील आहे ज्याला आज आपण "Data" म्हणतो आज तीच खरी संपत्ती आणि तीच खरी ताकद हे आपण मानतो परंतु हेच तत्व वेगळ्या भाषेत आपल्या भगवंताने अनादीकाळापूर्वी सांगून ठेवले आहे !
आपण तंत्रज्ञान विज्ञानाच्या जोरावर कितीही प्रगती केली तरी आपली मुळे हि आपल्या धर्माशी संस्कृतीशी जोडली गेली आहेत हे आपण जितक्या लवकर स्वीकारू तितक्या लवकर आपली वृद्धी होईल !
तर आता या ध्येयपूर्तीसाठी आणि फलप्राप्तीसाठी काय करावे हे तर आपल्याला वारंवार प्रत्येक अध्यायात भगवंताने सांगितले आहे कीं "इंद्रियांवर ताबा ठेवावा, स्वधर्माचे पालन करावे, आपले कर्म करत राहावे आणि अहंकाराचा त्याग करावा ! "
आता जर याच गोष्टींचे भाषांतर आपण केवळ इंग्रजी मध्ये केले तर आपल्याला जी उत्तरे मिळतील ती आपण Motivational Reels मध्ये वाचत नाही का ? एकदा विचार करून बघा !
उदा .
इंद्रियांवर ताबा ठेवावा - Self Control
स्वधर्माचे पालन करावे- Focus व Yourself
आपले कर्म करत राहावे - Do Your Job
अहंकाराचा -Less Ego
आधीच्या पिढीला कदाचित हि सोशल मीडिया ची भाषा आणि संदर्भ समजणार नाहीत परंतु आजच्या तरुण पिढीला मी काय म्हणतो आहे ते नक्की समजेल !
या पुढचा भाग म्हणजे मनातील संभ्रम , संशय
अर्थात परस्परांविरोधी भासणाऱ्या गोष्टी अथवा उपदेश ऐकल्या नंतर नक्की आपण काय करावे हा प्रश्न पडलाच असेल परंतु यावर उत्तर एकाच ते म्हणजे मनात संशय न ठेवता सत्य परिस्थिती समजून घ्यावी आणि आपले कर्म करावे अन्यथा संशयाच्या विळख्यात माणूस अडकला कि त्याची अधोगती किंवा नाश निश्चित आहे.
मनात संशय ठेवल्याप्रमाणे अनेक प्रकारे नुकसान माणसाला होते, ज्ञानार्जन करत असताना संशय बाळगू नये याची मुख्य २ कारणे मी मांडतो...
संशयामुळे आपल्याला गर्विष्ठपणा ( माज ) येतो आणि याच पायी आपण केवळ अर्धवट ज्ञान घेतो आणि हेच अर्धे घ्यान आपल्याला अतिशय घटक असते.
उदा संशय किंवा संभ्रमात राहून जर आपण या महान ग्रंथांचे वाचन सोडले तर हे आपल्यासाठी अतिशय धोक्याचे आहे !
आपल्याला जेव्हा खूप ताप येतो तेव्हा आपल्याला उष्ण आणि थंड यातील फरक समजत नाही तसेच संशयी माणसाला धर्म - अधर्म , सत्य आणि असत्य , न्याय अन्याय यातील फरक समाजात नाही आणि मनुष्य चुकीचा निर्णय घेतो.
तर आता या संशयाचा त्याग कसा करावा तर अर्थात ज्ञानाची प्राप्ती करून , सत्य परिस्थिती समजून आपण संशय दूर केला पाहिजे !
तें ज्ञान पैं गा बरवे । जरी मनीं आथि आणावें ।
तरी संतां यां भजावें । सर्वस्वेसीं ॥
अर्थात - हे अर्जुन जर ज्ञान हवे असेल तर संतांना विनम्रपणे शरण जा !
आपण मगाशीच सांगितलं ना या आजच्या काळात संत म्हणजे कोण ? देव म्हणजे कोण ? तर जे चांगले ज्ञान देतात अशांकडे विनयने जाऊन आपण ते ज्ञान ग्रहण करावे आणि आपल्या मनातील संशय , संभ्रम आदी दूर करावे हाच उपदेश श्रीकृष्णाने केला.
ज्या प्रमाणे सूर्याची तुलना फक्त सूर्याशी होऊ शकते, अमृताची तुलना केवळ अमृताशी होऊ शकते तशीच ज्ञानाची तुलना केवळ आणि केवळ ज्ञानाशीच होऊ शकते !
शांतिरस
आता या प्रचंड विश्वात ज्ञान मिळविण्यासाठी काय आवश्यक आहे तर तो म्हणजे शांतिरस होय..
जयाचिया बरवेपणीं । कीजे आठां रसांची वोवाळणी ।
जो सज्जनाचिये आयणी । विसांवा जगीं ॥
अर्थात - ज्याच्या शांती रसाच्या चांगलेपणावरून आठही रस (नऊरसांपैकी शांतरसा शिवाय इतर आठ रस) ओवाळून टाकावेत, जो या जगात सज्जनांच्या बुद्धीचे विश्रांतिस्थान आहे. ॥
तर आपण सर्वांनी शांतपणे संयम ठेवावा, आज चौथ्या अध्यायापर्यंत पोचलो म्हणून पाळ्या कोणालाच लगेच ज्ञान प्राप्त होणार नाही ,
सर्व प्रश्नांची उत्तरे मिळणार नाहीत परंतु या उपदेशातून मात्र आपण जे जे वेचतो आहोत त्याने आपले जीवन परिपूर्ण नक्की होईल असा विश्वास आपण घेऊन चालले पाहिजे !
जरी मंत्रेंचि वैरी मरे । तरी वायां कां बांधावीं कटारें ? ।
रोग जाय दूधसाखरें । तरी निंब कां पियावा ॥
तैसा मनाचा मारु न करितां । आणि इंद्रियां दुःख न देतां ।
एथ मोक्षु असे आयता । श्रवणाचिमाजि ॥
अर्थात - आपल्या आयुष्यात अनेक प्रसंग येतात आणि त्यातून बाहेर पाडण्यासाठी आपल्याला कष्ट घ्यावे लागतात किंवा एखाद्या आजाराला बरे करण्यासाठी कडू औषधाची गरज असते परंतु एकदा विचार करून पहा कि एखाद्या संकटातून बाहेर पडण्याचा सहज मार्ग सापडला किंवा एखाद्या आजारावर साखर औषध मिळाले तर आपण किती खुश असू ?
त्याचप्रमाणे या सर्व काळात आपण भगवत गीता पुन्हा पुन्हा वाचत राहावी / ऐकत राहावी आणि आपल्या आयुष्यातील अडचणींचे उपाय सहज मिळतील असे श्री ज्ञानेश्वर माउली म्हणतात !
इथेच या महान ग्रंथराजाच्या चौथ्या अध्यायाची अर्थात ज्ञानसंन्यासयोगाची सांगता करतो !
.png)



Comments